समता विद्यालयात बाहेरील 3 गावाहून प्रवास करून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यासाठी स्कूल बस ऐवजी महाविद्यालयाने टेम्पोची व्यवस्था केली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. त्यामुळे विद्यार्थांना प्रवासात अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे
उस्मानाबाद 20, जुलै : सापनाई गावातील समता वस्तीवरील समता विद्यालयाची (Samata Vidyalaya Sapnai) दुरवस्था झाली आहे. 10 वर्षाखाली शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. मात्र, अद्यापही काम पूर्ण झालेले नाही. सध्य परिस्थितीमध्ये शाळेची इमारत जीर्ण झाली आहे. सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. घाणीमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळेला संरक्षण भिंत नसल्याने व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणी वरती आला आहे.
गावाच्या बाहेर 500 मीटर लांब ही शाळा असूनही त्याची इतकी दुरवस्था व परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे शाळेमधील विद्यार्थी संख्या घटत असल्याने शाळा ओस पडू लागली आहे. वर्गात पाणी शिरत असून छत गळू लागले आहे. दुरवस्थेतील शाळा इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. याकडे संस्थेने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.
सापनाई गावात पाचवी ते दहावीपर्यंत शाळा भरते. शाळेत शंभरच्या आसपास विद्यार्थी आहेत. या शाळेसाठी गावातील काही व्यक्तींनी जमिनी दान केल्या, सुविधा निर्माण केल्या, गावातील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी म्हणून बक्षिसे जाहीर केली. मात्र, त्याच शाळा आता मोडकळीस आल्या आहेत. गावातील बहुतांश विद्यार्थी खासगी किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या शाळांकडे दुर्लक्ष केले जात आहे. समता विद्यालयात शाळेत 5 वी चा वर्ग अनेक वर्षांपासून पडझड झालेल्या खोल्यांमध्ये भरविण्यात येत आहे. या इमारतीच्या भिंतींना छिद्र पडली असून खोल्यांना आत्तापर्यंत दरवाजे आणि खिडक्या बसविल्या गेल्या नाहीत. छतालाही छिद्रे पडली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात या खोल्यांमध्ये पाणी गळते. इमारतीची अवस्था दिवसेंदिवस अधिकच वाईट होत आहे. शाळेच्या इमारतीचे बांधकाम कालबाह्य झाल्याने दुरवस्था झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या प्रश्नाकडे संबंधितांनी लक्ष देऊन शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालक करीत आहेत. पावसाळ्यामध्ये छत गळत असल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्गात बसणे जिकिरीचे होत आहे. शाळेच्या वेळेत पाऊस आल्याने उघड्या खिडक्यांद्वारे शाळेत पाणी शिरते. त्यामुळे वर्गात बसणे त्रासदायक होत असल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये घट होत आहे.
समता विद्यालयात बाहेरील 3 गावाहून प्रवास करून विद्यार्थी रोज शिक्षणासाठी येतात. यासाठी स्कूल बस ऐवजी महाविद्यालयाने टेंपो ची व्यवस्था केली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. त्यामुळे विद्यार्थांना प्रवासात अधिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पर्यायी विद्यार्थांना उभा राहून प्रवास करावा लागत आहे. गेल्या 8 वर्षापासून विद्यालयाने टेम्पोची परंपरा मोडून स्कूल बसची व्यवस्था केलेली नाही. विद्यार्थ्यांच्या प्रवासाचे हाल कधी संपणार अशी चिंता विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
वर्ग खोलीत कुत्री येऊन बसतात
आमच्या शाळेला प्लास्टर केलेले नाही त्यामुळे पावसाळ्यात भिंतीमध्ये मुरून आणि खिडक्या नसल्यामुळे पाऊस सुरू असताना वर्गात पाणी येते. दरवाजे सुद्धा नसल्यामुळे वर्गात कुत्री येऊन बसतात. वर्गात फ्रेश वातावरण नसल्याने अभ्यासामध्ये मन लागत नाही. आम्हाला टेंपो मधून उभा राहून प्रवास करावा लागतो. शाळेकडून बस नाही. सगळे शिक्षक आम्हाला छान शिकवतात पण शाळेत आल्यानंतर शाळेत आल्यासारखे वाटावे तरी. याकडे मुख्याध्यापकांनी लक्ष द्यायला हवे. अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
"आम्ही लवकर विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करू"
शाळेचे बांधकाम थोडे राहिले आहे ते आपण लवकर सुरू करत आहोत. शाळेला दरवाजे, खिडक्या नाहीत त्यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करतो. तीही अडचण लवकर दूर होईल. आम्ही लवकर विद्यार्थ्यांसाठी बस सुरू करू असे मुख्याध्यापक, चंदनशिवे यांनी सांगितले.
0 Comments