क्राईम सिटी म्हटल्या जाणाऱ्या नागपुरमधून सातत्याने गुन्हेगारीशी संबंधित घटना समोर येत आहेत. गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नुकतंच नागपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. या घटनेत एका पित्याला आपली चूक नसताना जीव गमवावा लागला आहे. आपल्या मुलीचा बचाव करणाऱ्या या पित्याला स्वतःच्या जीवाला मुकावं लागलं.
यात मुलीला का छेडतो? असा जाब विचारल्याने आरोपीनं मुलीच्या वडिलांची हत्या केली. ही धक्कादायक घटना नागपूरच्या गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलीस मुख्यालय परिसरात घडली आहे. घटनेत 35 वर्षीय नारायण द्विवेदी यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मनोज पांडे असं घटनेतील आरोपीचं नाव आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी गिट्टीखदान पोलीस स्टेशनला घेराव केला आहे. पोलीस स्टेशनबाहेर मोठी गर्दी झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं.
आठवडाभरापूर्वीच नागपुरमधून आणखी एक घटना समोर आली होती. यात एका हवाई क्षेत्राशी संबंधित प्रशिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीचा आक्षेपार्ह व्हिडिओ क्लिपिंग करून विनयभंग केला गेला होता. आरोपीसोबत एका कार्यक्रमात 17 वर्षीय विद्यार्थिनीची ओळख झाली होती. त्यानंतर त्यांचे रुपांतर मैत्रीत झाले. यानंतर अल्पेशने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढळे. दोघेही सोबत फिरायला लागले. यादरम्यान अल्पेशने विद्यार्थिनीची व्हिडिओ क्लिपिंग तयार केली. याप्रकरणी कपिल नगर पोलिसांनी आरोपी अल्पेश राजपाल शेंडे याला अटक केली .
0 Comments