बीड जिल्ह्यातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे.
त्यानंतर पती, सासू गर्भाची विल्हेवाट लावली. या धक्कादायक घटनेने खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यात पुन्हा राजरोस गर्भलिंग निदान आणि गर्भपात होत असल्याने राज्याला धक्काच बसला आहे. परळी शहरातील शिवाजीनगर भागात राहणाऱ्या सरस्वती नारायण वाघमोडे ही विवाहिता दुसऱ्यांदा गर्भवती राहिली. पहिली मुलगी असल्याने नवरा आणि सासूने गर्भलिंग निदान करण्याचा आग्रह केला. याला सरस्वतीचा विरोध होता. मात्र विरोध झुगारून मारहाण करतं गर्भलिंग निदान केले. मुलीचा गर्भ असल्याचं निदर्शनास आल्यानंतर गर्भपातासाठी आग्रह धरला. मात्र सरस्वती त्याला नकार देत होती. त्यातच थंडी-ताप आल्याने डॉक्टरांना बोलवून थंडी तापाचे इंजेक्शन देतो म्हणून विश्वासघाताने गर्भपाताचे इंजेक्शन दिले.
सरस्वतीच्या फिर्यादीनुसार २०२० साली तिचे लग्न नारायण अंकुश वाघमोडे याच्यासोबत झाले. नारायण परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रात नोकरीवर आहे. दुसरी मुलगी नको, मुलगाच हवा यासाठी सरस्वतीची सासू आणि पती तिच्यावर दबाव आणत होती. मुलगा असो की मुलगी मला गर्भपात करायचा नाही असे सरस्वतीने स्पष्टच सांगितले होते. मात्र बळजबरीने घरीच पोर्टेबल मशीन आणत डॉ. स्वामींना बोलावून गर्भलिंग निदान करून सरस्वतीला विश्वासघाताने इंजेक्शन टोचले आणि डॉ. स्वामींनी अक्षरश अमानुष पद्धतीने गर्भाचे तुकडे करून गर्भपात केला. यामध्ये सरस्वतीला आज देखील मोठ्या प्रमाणात वेदना होत आहे.
कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी नवरा आणि सासूने दिली होती. शेवटी त्रास सहन न झाल्याने आणि पोटचा गोळा कापून बाहेर काढल्याच्या संतापाने सरस्वतीने भावाकडे गेल्यानंतर आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. अखेर तिने पोलीस ठाणे गाठून झालेल्या प्रकाराविरोधात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून पती नारायण वाघमोडे, सासू छाया वाघमोडे, डॉ . स्वामी आणि प्रकाश कावळे या चौघांवर परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात कलम ३१३ , ३१५ , ३१८ , ३४ , ४९८ - अ , ५०४ , ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
0 Comments