▪️युवक कॉग्रेस तालुका अध्यक्ष कुनाल नाईक यांची प्रशासनाकडे मागणी
फुलसावंगी/प्रतिनिधी
गेल्या पाच ते सहा दिवसापासून सततधार पाऊस सुरू असुन त्यामुळे महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच तालुक्यात काही ठिकाणी सततच्या पावसामुळे घरांची पडझड झाली असल्यास त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेवून पंचनामे करावे व त्यांना देखील तात्काळ मदत द्यावी.फुलसावंगी,राहूर,शिरफुल्ली काळी यासह महागाव तालुक्यातील नदीकाठावरील,तसेच नाल्यालगतच्या शेतातील पिकांचे तात्काळ पंचनामे करून मदत जाहीर करावी यासाठी महागाव युवक कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष कुनाल नाईक यांनी तहसीलदार व्हि.एल.राणे यांना निवेदन देऊन मागणी केली.
आधीच खरीप हंगामात पावसाचे उशीरा आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणी ची वेळ आली होती.काही शेतकऱ्यांनी तर पदरमोड करून दुबार पेरणी केली होती.काही दिवसापुर्वी समाधानकारक पाऊस झाला.त्यामुळे पिके चांगल्या स्थितीत होती.परंतु गेल्या पाच ते सहा दिवसापासून सततधार पाऊस सुरू असल्याने पिके पिवळी पडून नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.तसेच लहान ओढे,नदीकाठच्या शेतातील सोयाबीन,कापूस,तूर,यासह इतर पिके वाहून गेली आहेत.तसेच राहूर व शिरफुल्लीसह महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.तसेच शिरफुल्ली येथील काही घरामध्ये पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पिकांचे व परिसरातील पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर करावी.अन्यथा युवक कॉग्रेस महागाव च्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनातून युवक कॉग्रेस चे तालुका अध्यक्ष कुनाल नाईक यांनी दिला.यावेळी शैलेश वानखेडे,विठ्ठल सोनुने,संदिप वायकुळे,ओमकार कलाने हे उपस्थित होते.
0 Comments