-->

Ads

जमिनीत जाणवली हालचाल; माती उकरताच दिसली 3 वर्षाची जिवंत मुलगी, सांगितली थरकाप उडवणारी कहाणी


भारतात मुलींचा जन्म हा अजूनही सहज स्वीकारला जात नाही. नकोशा असलेल्या मुलींना खूप हाल सहन करावे लागतात. बिहारमध्ये (Bihar) घडलेली एक घटना वाचून तुमचाही संताप अनावर होईल. नकोशा असलेल्या मुलीला जन्मानंतर पालकांनी रस्त्यावर किंवा जंगलात कुठेतरी सोडून दिल्याच्या संतापजनक घटना (crime News) तुम्ही ऐकल्या असतील; पण इथे तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीला तिच्या जन्मदात्या आईनेच जिवंत जमिनीत पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

बिहारमधील छपरा (Chhapra) जिल्ह्यात ही घटना घडली. या मुलीला जमिनीत पुरलं होतं, पण ती जिवंत होती. त्यामुळे तिने श्वास घेतल्यावर आणि हालचाल केल्यावर जमीन हालत होती. यावरूनच ही घटना उघडकीस आली. या संदर्भात आज तकने वृत्त दिलंय.

ही घटना कोपा मरहा नदीच्या काठावरील स्मशानभूमीतील आहे. घरगुती कामासाठी स्थानिक महिला तिथे पोहोचल्या होत्या. अचानक त्यांना एके ठिकाणची माती हालत असल्याचं दिसलं. त्यानंतर त्यांनी आरडाओरड करत ग्रामस्थांना बोलावलं. ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना (Police) दिली. पोलिसांनी मुलीला जमिनीतून बाहेर काढलं. स्थानिक एसएचओ आणि एएसआय रवींद्र सिंह यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला आणि मुलीला उपचारांसाठी सदर रुग्णालयात (Hospital) पाठवलं. या मुलीला काही वेळापूर्वीच जमिनीत पुरण्यात आलं असावं, त्यामुळे मुलगी वाचली, असं पोलिसांचं म्हणणं आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

दरम्यान, जमिनीतून बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी त्या चिमुकल्या मुलीची विचारपूस केली. तेव्हा मुलीने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांसह उपस्थित लोकांनाही धक्का बसला. मरणाच्या दारातून परतलेल्या निष्पाप मुलीने सांगितलं की, तिच्या आई आणि आजीने तिच्या तोंडात माती टाकली आणि नंतर तिला जमिनीत पुरलं. आपली आई आपल्याला फिरायला घेऊन आली होती, असं त्या मुलीने सांगितलं. मुलीने तिच्या आईचं नाव रेखा देवी आणि वडिलांचे नाव राजू शर्मा सांगितले आहे. मुलीला तिच्या गावाचे नाव पोलिसांना सांगता येत नाही. मुलगी खूप रडत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, तोंडात माती भरल्यानंतर तिला जमिनीत पुरण्यात आलं होतं, असं पोलीस म्हणाले. सध्या या चिमुकलीचे पालक आणि आरोपी रेखा देवी आणि राजू शर्मा यांना शोधून अटक करण्यासाठी पोलीस पथक पाठवण्यात आले आहे आणि मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसंच आरोपींच्या अटकेनंतरच त्यांनी स्वतःच्या मुलीला जमिनीत जिवंत का पुरलं, या प्रश्नाचं उत्तर मिळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली. अशी उदाहरणं वाचली की ही आई आहे की कैदाशीण असंच म्हणावसं वाटतं. ग. दि. माडगूळकरांच्या गीतरामायणातील माता न तू वैरिणी या राजमाता कैकयीला उद्देशून लिहिलेल्या ओळीही आठवतात.

Post a Comment

0 Comments