बचत गटाच्या अध्यक्षांकडून पोषण आहाराच्या बदल्यात लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन अंगणवाडी सेविकांना रंगेहात पकडण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली. सीमा राजेश राऊत (47), मंगला प्रकाश प्रधान (46) आणि उज्ज्वला भालचंद्र वासनिक (51), अशी तीन लाच मागणाऱ्या आरोपी महिलांची नावे आहेत.
याप्रकरणी एका ६० वर्षीय महिला बचत गटाच्या अध्यक्षांनी तक्रार केली होती. चार अंगणवाड्यांमध्ये ताज्या पोषण आहाराचा पुरवठा करण्याचे कंत्राट बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडून त्यांना मिळाले आहे. त्या अंगणवाड्यांमध्ये आरोपी अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविका दर महिन्याला पोषण आहार पुरवठ्याची माहिती पुस्तकात नोंदवतात. त्याआधारे पैसे बचत गटाला दिले जातात. पुस्तकात माहिती टाकण्याच्या बदल्यात आरोपी महिला तक्रारदाराकडे पैशांची मागणी करत होत्या. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली.
दर महिन्याला पोषण आहार वाटपासाठी 500 रुपये आणि साप्ताहिक सुट्टीसाठी 100 रुपये आणि चार अंगणवाड्यांसाठी 2400 मागण्यात आले. तक्रारदार महिलेला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे या महिला बचत गटाच्या अध्यक्षांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची खातरजमा करण्यात आली. यानंतर सापळा रचण्यात आला आणि अंगणवाडी सेविकांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले.
अंगणवाडी सेविकांनी तक्रारदाराला आवळे चौकात बोलावून घेण्यात आले होते. तेथे 2400 रुपये घेताना एसीबीने सीमा राऊतला अटक केली. त्यानंतर अन्य दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. राऊत आणि प्रधान यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या अंगणवाडी सेविका म्हणून काम करतात.
0 Comments