-->

Ads

बहिणीचा आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करणाऱ्या आतेभावाचा मामेभावाने केला खून

 एका तरुणाने दारूच्या पैशांसाठी इतकं विकृत काम केलं की, त्याला जीव गमवावा लागला.





    नवी दिल्ली, 16 जून : समाजात व्यसनाधीनतेचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. दारूचे व्यसन भागवण्यासाठी व्यक्ती कुठल्याही थराला जाऊ शकते. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये तर एका तरुणाने दारूच्या पैशांसाठी इतकं विकृत काम केलं की, त्याला जीव गमवावा लागला. त्याने मामेबहिणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट करून दारूसाठी पैसे न दिल्यास तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याच्या या कृत्याने संतापलेल्या मामेभावाने मित्रासोबत मिळून कुऱ्हाडीचे घाव घालून आतेभावाचा खून केला. या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. ‘आज तक’ने या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    खून झालेला ताराचंद महाराजपूर भागातील रहिवासी होता. त्याचा मृतदेह कानपुरातील चौबेपूर भागातील एका शेतात पोलिसांना 15 जूनला आढळला. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करायला सुरूवात केली. खुनाच्या एक दिवसआधी ताराचंद चौबेपूर येथील हर्षितसोबत शेवटचा दिसला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली. ताराचंद हा हर्षितचा आतेभाऊ होता आणि घटनेच्याआधी दोघं एकत्र असल्याने संशयाची सुई हर्षितकडे इशारा करत होती. त्यामुळे पोलिसांनी हर्षितला ताब्यात घेतलं आणि खुनाचं गूढ उकललं.


    हर्षितने पोलिसांना सांगितल्यानुसार, काही दिवसांपूर्वी हर्षितचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नात्यात असल्यामुळे ताराचंदही यात सहभागी झाला होता. वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी ताराचंदने हर्षितच्या बहिणीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ तयार केला. याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त हर्षितने त्याला व्हिडिओ डिलिट करण्यास सांगितले. पण ताराचंदने दारूसाठी पैसे मागितले. त्यामुळे हर्षितचा राग आणखी अनावर झाला. त्यामुळे त्याने बाजारातून 200 रुपयांची कुऱ्हाड खरेदी केली आणि मंगळवारी हनुमान मंदिरातील उत्सवात सहभागी होण्याचा बहाणा करत तो ताराचंदला घेऊन गेला. हर्षितने त्याचा मित्र शोभितलाही सोबत घेतलं. ताराचंदला खूप दारू पाजली आणि कुऱ्हाडीने घाव घालून त्याचा खून केला व मृतदेह शेतात टाकून दोघे पसार झाले. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. हर्षितला ताब्यात घेऊन याबद्दल विचारले तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने घडलेला सर्व प्रसंग सांगितला.

    या प्रकरणात बोलताना कानपूरचे पोलीस अधीक्षक तेज स्वरूप सिंह म्हणाले की, पोलिसांनी खुनाच्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे. बहिणीचा अक्षेपार्ह व्हिडिओ तयार केला आणि तो डिलिट करण्यासाठी ताराचंदने पैसे मागितल्यामुळे हर्षितने त्याचा खून केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे. छेडछाडीच्या बाजूनेही या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तपासाअंती या प्रकरणात पुढील कारवाई केली जाणार आहे.

    Post a Comment

    0 Comments