-->

Ads

IND vs SA T20 Series : टीम इंडियाची आज निवड, हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी?

  आयपीएल 2022 (IPL 2022) मधील साखळी फेरीतील शेवटचा सामना आज (रविवार) होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद विरूद्ध पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यातील या मॅचची आता औपचारिकता बाकी आहे.  या सामन्याच्या दरम्यान टीम इंडियाची दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या मालिकेसाठी निवड होणार आहे. 9 जून पासून सुरू होणाऱ्या या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी सिनिअर खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार असून आयपीएल स्पर्धा गाजवलेल्या खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे.

आयपीएल स्पर्धेतील थकवा आणि आगामी काळातील भरगच्च वेळापत्रक लक्षात घेता बीसीसीआय टीम इंडियाच्या वरिष्ठ खेळाडूंना या मालिकेत विश्रांती देणार आहे. नियमित कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली जाऊ शकते.

रोहित शर्माला विश्रांती दिल्यास टीम इंडियाचा या मालिकेत कॅप्टन कोण असेल हा प्रश्न स्वाभाविकच उपस्थित होतो. आयपीएलमधील गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या टीमचं नेतृत्त्व केलेल्या हार्दिक पांड्याचं (Hardik Pandya) नाव कॅप्टनपदासाठी सर्वात आघाडीवर आहे. हार्दिकच्या कॅप्टनसीमध्ये खेळणाऱ्या गुजरात टायटन्सनं या आयपीएलमध्ये सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

गुजरातनं 14 पैकी 10 सामने जिंकत पहिल्या क्रमांकासह आयपीएल 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला आहे. हार्दिकनं आघाडीवर राहून टीमचं नेतृत्त्व केलं आहे. त्यानं 13 सामन्यात 41.30 च्या सरासरीनं 413 रन केले आहेत. यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्यानं 7.79 च्या इकोनॉमी रेटनं 4 विकेट्स घेत आपण बॉलिंग करण्यासही फिट असल्याचं दाखवून दिलंय. हार्दिकला या चांगल्या कामगिरीमुळेच कॅप्टनपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

टीम इंडियाचे रविंद्र जडेजा आणि दीपक चहर हे खेळाडू जखमी आहेत. सुर्यकुमार यादवचा टीममधील समावेश देखील त्याच्या फिटनेसवरच अवलंबून आहे. या परिस्थितीमध्ये आयपीएल स्पर्धेत चांगली कामगिरी केलेल्या राहुल त्रिपाठी, शिखर धवन, दिनेश कार्तिक, आवेश खान यांचा टीममध्ये समावेश नक्की मानला जातोय. त्याचबरोबर उमरान मलिक, अर्शदीप सिंग, मोहसीन खान यांची नावंही चर्चेत आहेत. रोहित आणि राहुल हे नियमित ओपनर्सना विश्रांती देण्यात येणार असल्यानं शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांचाही विचार निवड समिती करू शकते.

Post a Comment

0 Comments