उल्हासनगरमधून (Ulhasnagar) एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. रुम भाड्याने दिला नाही म्हणून वृद्ध मालकिणीला तसेच तिच्या मुलाला मारहाण करण्यात आली आहे.
उल्हासनगरच्या कॅम्प एकमधील साधुबेला शाळेजवळ उषा सुरेंद्र सिंग या राहतात. उषा सिंग यांचं घर दोन मजली आहे. त्यांच्या घराच्या बाजूलाच अजय पवार तरुणही राहतो. अजय हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा तरुण आहे. अजयला उषा यांच्या घराच्या वरचा मजला अजय भाड्याने हवा होता. मात्र, अजयची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता उषा यांनी त्याला घर भाड्याने देण्यास नकार दिला.
याचाच राग मनात त्याने मनात ठेवला. यानंतर अजय पवार आणि त्याच्या इतर 3 साथीदारांनी आधी 2 एप्रिल रोजी उषा यांचा मुलगा शिवजीत याला मारहाण केली. यानंतर पुन्हा 8 मे रोजी रात्री अजय पवार आणि त्याचा मित्र अमित माखिजा यांनी उषा यांच्यासह त्यांचा मुलगा इंद्रजित याला मारहाण केली. मारहाण करणारे तडीपार गुन्हेगार असल्याचं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे
अजय पवार आणि त्याचा मित्र अमित माखिजा अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी या दोन आरोपींना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून एक पिस्तुल आणि एक सुरा जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्यात पोलीस आरोपींचा शोध घेत असतानाच हे दोघे नेहरू नगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अंगझडतीत एक देशी पिस्तुल, एक जिवंत राऊंड, एक सुरा पोलिसांनी जप्त केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
0 Comments