गुंतवणूक करून त्यातून प्रचंड मोठ्या प्रमाणात परतावा मिळणं शक्य नसतं, ही वस्तुस्थिती आहे. तरीही आजही अनेक जण अशा खोट्या दाव्यांना भुलतात. त्यात विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यातल्या (Pune) नागरिकांचाही समावेश असतो, हीदेखील एक आश्चर्याची बाब. अलीकडेच 48 वर्षांच्या एका पुणेकराला दोन जणांनी 21.66 लाख रुपयांना गंडा घातला. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
थेरगावमध्ये (Thergaon) राहणाऱ्या 48 वर्षांच्या एका व्यक्तीची इंटरनेटवरून (Internet Scam) दोघांनी फसवणूक केली आहे. जुलै 2021मध्ये दोघा घोटाळेबहाद्दरांनी ट्रेडशॉटएफएक्स (TradeshotFX) नावाच्या अस्तित्वात नसलेल्या फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीत (Forex Trading Company) गुंतवणूक करण्यास आकर्षित केलं. त्या कंपनीत गुंतवणूक केलेल्या अन्य गुंतवणूकदारांना कसा चांगला परतावा मिळाला, याची माहिती देणारे काही स्क्रीनशॉट्स त्या दोघांनी या व्यक्तीला फॉरवर्ड केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने बँक खातं, तसंच यूपीआयद्वारे तब्बल 21.66 लाख रुपये त्या व्यक्तींना ट्रान्स्फर केले. तरीही त्या व्यक्तीला खात्रीशीर सांगण्यात आलेला परतावा मिळालाच नाही. अखेर त्या व्यक्तीने सोमवारी (2 मे) वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. घोटाळेबाजांनी हितेश आणि संजय अशी आपली नावं सांगितली होती. त्या व्यक्तींविरोधात पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्याची (Information Technology Act) कलमं, तसंच भारतीय दंडविधान कलम (Indian Penal Code) 406 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ठरावीक प्रमाणापेक्षा जास्त अर्थात अव्वाच्या सव्वा प्रमाणात रिटर्न्स (More Returns) मिळण्याचा दावा कोणी करत असेल, त्याला भुलून न जाता त्याबद्दल शंका आली पाहिजे. बारकाईने माहिती घेतल्याशिवाय कोणत्याही ऑनलाइन किंवा ऑफलाइन योजनेत पैसे गुंतवू नयेत, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.
0 Comments