मध्यरात्री अडीचच्या सुमारास विकाराबाद पोलीस नियंत्रण कक्षाला एक फोन आला. पोलिसांनी फोन उचलताच मधू नावाचा एक तरुण फोनवर बोलू लागला - 'मला मदत हवी आहे'. पोलिसांनी विचारलं की - काय झालं? यावर तरुण म्हणला - 'तो फोनवर सांगू शकत नाही. पोलिसांना त्याच्या घरी यावं लागेल.' मधूने त्याच्या घराचा पत्ता सांगून फोन ठेवला. इकडे तरुणाचं बोलणं ऐकून तो काहीतरी अडचणीत असल्याचं पोलिसांना वाटलं. मधूने सांगितलेल्या पत्त्यावर गस्त घालणाऱ्या हवालदारांना लगेच पाठवण्यात आलं
आपण विकाराबाद शहरातील दौलताबाद परिसरात राहतो, असं मधुने पोलिसांना सांगितलं होतं. गस्तीवर असलेले पोलीस त्याच्या घरी पोहोचले. मात्र सत्य जाणून चक्रावून गेले. डेक्कन क्रॉनिकलच्या वृत्तानुसार, मधुने हवालदारांना सांगितलं की, 'दौलताबादमध्ये सर्व दारूची दुकानं बंद आहेत. त्यामुळं मला दोन थंड बिअरच्या बाटल्या आणून द्या.'' मधुचं बोलणं ऐकून हवालदार आश्चर्यचकित झाले. त्यानंतर त्यांनी मधुला चोप देऊन अद्दल घडवली आणि त्याच्यावर एक छोटासा गुन्हा दाखल केला. रिपोर्टनुसार, तो आधीच दारूच्या नशेत होता.
कोणीतरी अशाप्रकारे 100 नंबर डायल करून पोलिसांना त्रास देण्याची ही पहिलीच वेळ नाही. मार्चमध्येच तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नवीननेही पोलिसांना 100 क्रमांकावर सहा वेळा कॉल करून आपत्कालीन स्थितीत असल्याचं सांगितलं होतं. जेव्हा पोलीस त्याच्या घरी पोहोचले तेव्हा त्याने सांगितलं की त्याची पत्नी त्याच्यासाठी मटन करी बनवत नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीनदेखील दारूच्या नशेत होता. तेलंगणा टुडेच्या वृत्तानुसार, पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतलं आणि नंतर त्याची सुटका करण्यात आली.
तसंच गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे एका महिलेनं 100 नंबर डायल करून पोलिसांची मदत मागितली. तिचा प्रियकर तिच्यावर रागावला होता आणि बोलत नव्हता, म्हणून तिने थेट पोलिसांनाच मदत मागितली. फ्री प्रेस जर्नलमधील रिपोर्टनुसार, महिलेचं तिच्या प्रियकरासोबत काही कारणावरून भांडण झालं होतं. तिने सर्व प्रयत्न करूनही प्रियकर ऐकत नसल्याने तिने मदतीसाठी 100 नंबर डायल केला.
0 Comments