-->

Ads

बापरे! अंत्यसंस्कार झाले, पिंडदानही उरकलं; 10 दिवसांनी जिवंत परतली ती व्यक्ती

 अंत्यसंस्कार आणि पिंडदान झाल्यानंतर तब्बल 10 दिवसांनी मृत व्यक्ती जिवंत घरी परतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित व्यक्तीला जिवंत पाहून कुटुंबीयांना आनंदाचा पारावार उरला नव्हता.

राजसमंद, 26 मे: अंत्यसंस्कार आणि पिंडदान झाल्यानंतर तब्बल 10 दिवसांनी मृत व्यक्ती जिवंत घरी परतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दहा दिवसांपूर्वी पोलिसांनी जिवंत व्यक्ती ओंकारलालला मृत समजून एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला होता. या घटनेनंतर कुटुंबीयांनी शोकसागरात बुडून अज्ञात व्यक्तीवर ओंकारलाल समजून अंत्यसंस्कार आणि पिंडदानही केलं. पण अंत्यसंस्काराच्या 10 दिवसानंतर ओंकारलाल जिवंत घरी परतले आहेत. ओंकारलालला जिवंत पाहून कुटुंबीयांचा आनंदाला पारावार उरला नाही. पण पोलिसांच्या हलगर्जीपणाचा नाहक त्रास कुटुंबीयांना सहन करावा लागला आहे.

संबंधित घटना राजस्थानातील राजसमंद याठिकाणी घडली आहे. येथील ओंकारलाल दहा दिवसांपूर्वी घरी कोणालाही न सांगता उदयपूर याठिकाणी गेले होते. दरम्यान 11 मे रोजी पोलिसांना एक मृतदेह सापडला होता. काहीजणांनी हा मृतदेह आर. के. जिल्हा रुग्णालयात जमा केला. यावेळी जिल्हा प्रशासनानं कांकरोली पोलिसांना पत्र पाठवून मृतदेहाची ओळख पटवण्यास सांगितलं. पण पोलिसांना अज्ञात व्यक्तीबद्दल काहीही माहिती मिळाली नाही. दरम्यान 15 मे रोजी पोलिसांनी सोशल मीडियावरील पोस्ट पाहून ओंकारलाल यांचा भाऊ नानालाल यांना रुग्णालयात बोलावून घेतलं.


यावेळी नानालाल यांनी आपल्या भावाची ओळख पटवण्यासाठी ओंकारलाल यांच्या उजव्या हाताला मनगटापासून कोपरापर्यंत जखमेची खूण असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर डाव्या हाताची बोटं वळलेली असल्याचंही नानालाल यांनी पोलिसांना सांगितलं. लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, पोलिसांनी रुग्णालयात ठेवलेला मृतदेह ओंकारलाल यांचाच असल्याचं सांगत हा मृतदेह ओंकारलाल यांच्या कुटुंबीयांना सोपावला. यानंतर कुटुंबीयांनी अज्ञात व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. तसेच ओंकारलालच्या मुलानं वडिलांच्या निधनामुळे टक्कलही केलं.


दुसरीकडे, अंत्यसंस्कारानंतर 10 दिवसांनी ओंकारलाल सुखरूप घरी परतले आहेत. त्यांना पाहून कुटुंबीयांचा आनंद गगनात मावला नाही. परंतु पोलीस प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला आहे. 11 मे रोजी आपण कुटुंबातील कोणालाच न सांगता उदयपूर याठिकाणी गेलो होतो. त्याठिकाणी गेल्यानंतर अचानक प्रकृती बिघडली त्यामुळे चार दिवस रुग्णालयात उपचार घेतले. जवळचे सर्व पैसे उपचारात खर्च झाल्यानं ओंकारलाल 6 दिवस उदयपूरमध्येच भटकले, अशी माहिती ओंकारलाल यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments