मुंबईमध्ये 10 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान आयपीलचे (IPL 2021) दहा सामने होणार आहेत. लॉकडाऊन किंवा आणखी कडक निर्बंध लादण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यास हे सामने अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मुंबई, 3 एप्रिल : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना पेशंट्सची संख्या सातत्याने वाढत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील (Wankhede Stadium, Mumbai) आठ कर्मचाऱ्यांना (groundsmen) कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबईमध्ये लॉकडाऊन लागू करण्याचा विचार महाराष्ट्र सरकार करत आहे, अशी चर्चा आहे. याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर झालेली नसली तरी मुंबईसह महाराष्ट्रावर सध्या लॉकडाऊनची टांगती तलवार आहे.
मुंबईमध्ये 10 एप्रिल ते 25 एप्रिल दरम्यान आयपीलचे (IPL 2021) दहा सामने होणार आहेत. लॉकडाऊन किंवा आणखी कडक निर्बंध लादण्याचा निर्णय सरकारनं घेतल्यास हे सामने अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं (BCCI) प्लॅन बी वर काम करण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईतील सामने गरज पडली तर हैदराबादमध्ये होऊ शकतात. 'ईएसपीएन क्रिकइन्फो' या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. आयपीएल स्पर्धा ही यंदा मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरु आणि अहमदाबाद या सहा शहरांमध्ये होणार आहे. या सहा शहरांमध्ये हैदराबादचा समावेश नाही. मुंबईमध्ये लॉकडाऊन लागू झाल्यास पर्याय म्हणून हैदराबादला पसंती मिळू शकते.बीसीसीआयनं याबाबत अद्याप कोणत्याही फ्रँचायझीला मुंबईतील सामने दुसरीकडं खेळवण्याबाबतची माहिती दिलेली नाही.
कोरोना व्हायरसमुळे मागील वर्षी आयपीएल स्पर्धा युएईमध्ये झाली होती. यंदा ही भारतात होत आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा ही मैदानातील प्रेक्षकांच्या उपस्थितीशिवाय होणार आहे. तसंच स्पर्धेतील सर्व सहभागी खेळाडू तसंच कर्मचाऱ्यांना बायो-बबलचे पालन करणे बंधनकारक आहे.
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (MI vs RCB) या सामन्यानं 9 एप्रिल रोजी चेन्नईमध्ये आयपीएल स्पर्धा सुरु होईल. 30 पर्यंत ही स्पर्धा चालणार असून फायनल मॅच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे.
0 Comments