ज्या दोन व्यक्तींचा सचिन वाझे (Sachin Vaze) बनावट एनकाउंटर करणार होता ते दोन्ही व्यक्ती एका हाय प्रोफाइल गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार होते. ज्यांच्याकडे वाझे जिवंत काडतुसं देऊन त्यांचा एनकाउंटर करणार होता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई, 17 एप्रिल: अगदी एखादा सिनेमा किंवा वेब सिरीजही फिकी पडेल आणि सस्पेन्सवर सस्पेन्स निर्माण करून प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असे अपडेट सचिन वाझे प्रकरणात (Sachin Vaze Case) समोर येत आहेत. या प्रकरणात आता बनावट एनकाउंटरचा देखील अँगल समोर येत आहे. यामध्ये एनआयएने सचिन वाझेच्या घरावर दिवसभर छापे टाकून 62 गैरसरकारी जिवंत काडतुसे जप्त केली होती. या गैरसरकारी काडतुसांबद्दल आता एक नवीन आणि धक्कादायक खुलासा समोर आला आहे. या गैरसरकारी जिवंत काडतुसांचं कनेक्शन कार मायकल रोडवर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीशी आहे.
या प्रकरणात वाहवा मिळवण्यासाठी वाझे याने सविस्तर योजना आखल्याची माहिती समोर येते आहे. या प्रकरणात बनावट एनकाउंटर करण्यासाठी ही काडतुसं आणण्यात आली होती. दरम्यान ही गैरसरकारी जिवंत काडतुसं कुठून आणली आणि वाझेला ती कुणी दिली याचा तपास करत असताना तपास यंत्रणांना आणखी एक महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, एका हाय प्रोफाइल गुन्ह्यातील 2 सराईत गुन्हेगारांना दहशतवादी जाहीर करून त्यांचा कार मायकल रोडवर बनावट एनकाउंटर करण्याची वाझेची योजना होती. वाझे या दोघांजवळ हत्यारं ठेवून त्यात ही गैरसरकारी काडतुसं ठेवण्याच्या मास्टरप्लॅनसह त्यांच्यावर कार माइकल रोड प्रकरणाची जबाबदारी टाकणार होता. मात्र हा प्लॅन रद्द करून वाझेने प्लान बी वापरण्याचं ठरवलं, वाझेने असा निर्णय का घेतला याचा तपास NIA करत आहे.
या दोन हाय प्रोफाईल गुह्यातील सराईत गुन्हेगारांची सचिन वाझेने का निवड केली होती याचा देखील तपास एनआयए करत आहे. या दोन व्यक्तींची ओळख एनआयए ने अतिशय गुप्त ठेवली असून या दोन्ही गुन्हेगारांच्या जीवाला अजूनही धोका असल्याचं NIA च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीत म्हटलं आहे.
सचिन वाझे यांच्या घरातील झडतीदरम्यान जो एका अनोळखी व्यक्तीचा पासपोर्ट सापडला होता त्या व्यक्तीबरोबर आणखी एक दुसरी व्यक्ती होती. या दोन्ही व्यक्ती म्हणजे हेच दोन गुन्हेगार आहेत. वाझेने या दोघांचा बनावट एनकाउंटर करण्याचा कट रचला होता आणि त्यानुसारच सगळं केलं जात होतं. सूत्रांच्या माहितीनुसार याच करता औरंगाबादमधील शहर चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीततून एक इको गाडी सोडण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, याच गाडीतून सचिन वाझेने मनसुख यांच्या हत्येच्या रात्री म्हणजेच 4 मार्च रात्री प्रवास केला असावा असा संशय देखील तपास यंत्रणांना आहे. त्या दृष्टीने आता तपास यंत्रणा पुरावे गोळा करत आहे
0 Comments