धुळ्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार; तिघे पोलिसांच्या ताब्यात
धुळे जिल्ह्यात रेमडिसेवरचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना धुळे एलसीबीने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रेमडीसीवरसह सुमारे 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान रेमडीसीवर हे इंजेक्शन देवपुरात 16 हजार रुपयात विकले जाणार होते. व्यवहार होण्यापूर्वी एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
कोरोनाने सर्वत्र कहर केला आहे. अशावेळी कोरोना बाधित रुग्णांना दिलासा देवून मदतीचा हात पुढे करण्याऐवजी काही जण रेमडीसेवर या इंजेक्शन चा काळ्या बाजारात जास्त दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाला मिळाल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी संजय यादव, पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव यांनी अशा अमानविय कृत्य करणार्यांचा शोध घेवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
त्याच पार्श्वभूमीवर धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी पथके तयार केले होते. बनावट ग्राहक तयार करून देवपुरातील दत्तमंदिर चौकात सापळा रचून रेमडीसेव्हरचे इंजेक्शन 16 हजारात विकणार्या धुळे शहरातील रहिवासी असलेल्या कृष्णा भिकन पाटील याला एलसीबीच्या पथकाने पकडले. त्याच्याकडून एक रेमडीसेवर इंजेक्शन, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण 38 हजार 899 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चौकशीत त्याने त्याच्या दोन साथीदारांची नावे सांगितले. त्यावरुन सागर विलास भदाणे आणि चिलेश कैलास भामरे या दोघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी तिघाविरुध्द देवपुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी दिली.
0 Comments