कल्याण :- एन्टी नार्कोटिक सेलसह मुंबई ठाण्यातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला महात्मा फुले पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. विशेष म्हणजे हा आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.
रहमत युसुफ पठाण असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या घराच्या झडतीत पोलिसांनी 27 किलो वजनाचा 4 लाखांचा गांजा जप्त केला आहे. मात्र त्यांची कोरोना टेस्ट पोझीटीव्ह आल्याने त्याला सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सराईत गुन्हेगार असलेला रहमत युसुफ पठाण यांच्या विरोधात नोव्हेंबर 2020 मध्ये महात्मा फुले पोलीस ठाण्यात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल होता.
मात्र त्यानंतर तो पसार झाला होता. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी दोन वेळा सापळा रचला मात्र दोन्ही वेळी रहमत निसटला.
रहमत आपल्या कल्याण पश्चिमेकडील पीर रोड येथील राहत्या घरात असल्याची माहिती मिळाल्याने महात्मा फुले पोलिसांना मिळाली.
पोलीसांच्या पथकाने 24 एप्रिल रोजी रात्री 2 च्या सुमारास घेराव घालत या आरोपीला राहत्या घरातून अटक केली आहे.
त्याच्या घरातून पोलिसांनी 4 लाख रुपयाचा गांजा जप्त केला असून त्याच्यावर २००९ पासून अन्टी नार्कोटीक्स सेल, मुंबई, सांताक्रूझ पोलीस ठाणे, चेंबूर पोलीस ठाणे, बाजारपेठ पोलीस ठाणे पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.
या आधी त्याने शिक्षा देखील भोगलेली आहे. मात्र एक गुन्ह्यात तो फरार होता. दरम्यान या आरोपीला अटक केल्यानंतर नियमानुसार त्याच्या केलेल्या कोरोना तपासणीत तो कोरोना पोझीटीव्ह आल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यातआले असून त्याच्या चौकशीत आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
0 Comments