Beed Coronavirus Update: मांडवा रोडवरील स्मशानभूमित हा प्रकार घडला. व्हायरल होणारा फोटो अनेकांचा डोळ्याच्या कडा ओला करणारा आहे.
बीड, 07 एप्रिल: कोरोना काळात (Coronavirus Pandemic) काही हृदयद्रावक घटना समोर येत आहेत, ज्यामुळे काळजात अगदी चर्रर होऊन जातं. गेल्यावर्षी लॉकडाऊन (Lockdown 2020) काळातही अनेक फोटो-व्हिडीओ समोर आले होते आणि तेच सत्र यावर्षीही सुरूच आहे. बीडमधून (Beed Corona News) एक चित्त विचलित करणारी घटना समोर येते आहे. बीडमध्ये कोरोनाची आकडेवारी (COVID-19 Cases in Beed) चिंताजनक आहे. दिवसागणिक याठिकाणी रुग्ण वाढत आहेत. दरम्यान अंबाजोगाईमध्ये एकाच दिवसात आठ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता आणि धक्कादायक म्हणजे नगरपालिकेकडून एकाच सरणावर या आठ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.
मांडवा रोडवरील स्मशानभूमित हा प्रकार घडला. व्हायरल होणारा फोटो अनेकांचा डोळ्याच्या कडा ओला करणारा आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये असणारे स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय आणि लोखंडी सावरगावच्या कोव्हिड सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना पेशंट्स आहेत. हा आकडा दिवसागणिक वाढतो आहे. दररोज शंभरहून अधिक रुग्ण याठिकाणी भरती होत आहेत. मृत्यूदरही आधीपेक्षा अधिक झाला आहे.
स्वाराती आणि लोखंडी सावरगाव या दोन्ही सेंटरमधील एकूण आठ रुग्णांवर एकाचवेळी नगरपालिकेकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. मीडिया अहवालानुसार गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात देखील अशीच घटना घडली होती. तेव्हा देखील आठ रुग्णांवर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
बीड जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णांची वाढती साखळी तोडण्यासाठी दहा दिवसांचे लॉकडाऊन करूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही. उलट रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागल्यानं चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी एका दिवसात तब्बल 716 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये बीड शहर आणि तालुक्यातील 131 आणि अंबाजोगाईत 161 रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी जिल्ह्यात कडक निर्बंध लावले आहेत. मंगळवारी जिल्ह्यात सर्वात कोरोना चाचण्या करण्यात आल्या. मंगळवारी एकूण 2 हजार 37 रुग्णांचे स्वॅब तपासण्यात आले होते. यात 716 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई 161, आष्टी 98, बीड 131, धारूर 29, गेवराई 43, केज 64, माजलगाव 34, परळी 88, पाटोदा 31, शिरूर 31 आणि वडवणीमध्ये 6 रुग्ण आढळून आले आहेत.
0 Comments