शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उल्हासनगर, 09 मार्च : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar)इलेक्ट्रॉनिक दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी चोरी (Theft) केल्याची घटना घडली. चोरीचा हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV) कैद झाला आहे. विशेष म्हणजे, चोरांनी मास्क (Mask) लावून चोरी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्प नंबर 3 च्या रेल्वे स्टेशन कवरराम चौक परिसरातील जय शंकर नावाचे इलेक्ट्रॉनिकचे दुकान आहे. या दुकानात शनिवारी पहाटे 6 च्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे लोखंडी ग्रील आणि शटर कटावणी सारख्या हत्याराने वाकवून, टाळे तोडून आत प्रवेश केला. जवळजवळ अर्धातासापेक्षा अधिक वेळ या चोरटयांनी कॅश काउंटरमध्ये शोधाशोध केली. त्यानंतर त्यांना कॅश काउंटरमध्ये एक लाख रुपयांची रोख रक्कम सापडली. रक्कमे बरोबरच त्यांनी दुकानातील इलेक्ट्रॉनिक साहित्य देखील चोरी केले.
दरम्यान चोरीचा हा प्रकार दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. दुकानाचे मालक प्रकाश पाहूजा सकाळी दुकान उघडण्यासाठी आल्यावर त्यांना दुकानाचे शटर उचकटल्याचे लक्षात आले, त्यानंतर कॅश काउंटरमधील रक्कम चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर चार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मध्यवर्ती पोलिसांनी आता दुकानातील सीसीटीव्ही ताब्यात घेत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
शहरात दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात चोरीच्या घटना वाढल्या आहेत, त्यामुळे या भागात पोलिसांच्या गस्त वाढवण्यासाठी पत्रव्यहार देखील केला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भविष्यात इथे पोलिसांनी गस्त वाढवून लक्ष दिले नाही तर व्यापारी आपल्या पद्धतीने आंदोलन छेडतील असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सगळ्यांचीच चिंता वाढली आहे. यातून चोरटे देखील सुटले नाहीत. चोरी करताना चोरटे आता मास्क लावून चोरी करत आहेत. यापूर्वी चोरटे मंकी कॅप, मफलर आणि रुमालाने तोंड झाकून चोरी करायचे, मात्र, आता अनेक चोरटे मास्क लावून चोरी करतात. यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावापासून त्यांचा बचाव तर होतोच शिवाय ओळखही लपली जाते, असे दुहेरी फायदे चोरट्याना या मास्कमुळे होत आहेत.
0 Comments