मुंब्रा- कौसा भागातील पाण्याची समस्या गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मार्गी लावली आहे. या भागातील नळसंयोजनाचा आकार वाढविण्यासोबतच एमआयडीसीकडून या भागाला होणार्या पाणीपुरवठ्यात आता ५ द .ल.लि. ची वाढ करण्याचे आदेश त्यांनी दिले असून आजपासूनच मुंब्रा भागात ४६ दशलक्ष लिटर्स पाण्याचा पुरवठा होणार आहे.मुंब्रा भागातील पाणी पुरवठा योजनेच्या अनुषंगाने गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीस मुंब्रा कौसाचा विधि मंडल, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांचे मुख्य अभियंता सुधाकर वाघ आदी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये मुंब्रा विभागास होणार्या अपुर्या पाणी पुरवठ्याबाबत सविस्तर चर्चा करुन येथील पाण्याची समस्या निकाली काढण्याचे आदेश ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी दिली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत मुंब्रा विभागास कल्याण फाटा येथून होणारा पाणी पुरवठा अपुरा असल्याने सदरचा पाणी पुरवठा वाढविणे बाबत सविस्तर चर्चा झाली. सध्या मुंब्रा कनेक्शनद्वारे ४१ते४२ द.ल.लि. प्रतिदिन एवढाच पाणी पुरवठा होत आहे. सदरचा पाणी पुरवठा वाढवून 46 द.ल.लि. प्रतीदिन पाणी पुरवठा करण्याचे आदेश गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी एमआयडीसीला दिले. या आदेशाची अंमलबजावणी मंगळवारपासूनच होत आहे.
यावेळी डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी भ्रमणध्वनी वरुन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन यांच्याशी चर्चा केली व मंजूरी प्रमाणे पाणी पुरवठा करण्यासंदर्भात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिनीवरील नळ संयोजनाचा आकार वाढविण्याच्या सुचना दिल्या. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला व संयोजनाचा आकार वाढविण्याबाबत प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे सांगितले. दरम्यान, पुढील महिन्यापासून सुरु होणार्या रमजान व इतर सणांच्या काळात शटडाऊन न घेण्याच्या सूचनाही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी पालिका आणि एमआयडीसीला केल्या.
0 Comments