-->

Ads

त्याच्या मनात विकृतीचा ‘निवास’, नराधमाने थांबवला रूपालीचा श्वास ......

 



मोबाईल तंत्रज्ञान विकसित झाले, त्याचा फायदा सार्‍या जगाला मिळाला. याच मोबाईल तंत्रज्ञानामुळे अवघी दुनिया मुठ्ठी में है| हे खरे झाले, पण याच हातांच्या मुठीमधील मोबाईल चावट यंत्र बनले, ही त्याची दुसरी बाजू आहे. मोबाईलवर हव्या त्या पॉर्न साईट पहाता येतात ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे आजची पिढी बरबाद होत आहे. पूर्वी महिनाभर दोन जीबी डाटा मिळत होता. आज रोज दीड ते दोन जीबी डाटा कसा संपवायचा, तर पॉर्न फिल्म पाहून. ही सत्य परिस्थिती आहे, ही विकृती बड्या शहरापासून ते पार खेड्यापाड्यात पसरली आहे. शिराळा तालुक्यातील देववाडी गावात पॉर्न फिल्म पाहून वाया गेलेले पोरं निवास उर्फ धनाजी पंडीत खोत (वय २०) याने विकृतपणाचा कळस केला. विवाहित महिलेसमवेत झोंबाझोंबी केली. बलात्कार करण्याचा त्याचा प्रयत्न त्या विवाहितेने हाणून पाडला, तेंव्हा त्याने तिला विहीरीत ढकलून देवून खून केला. या घटनेमुळे जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.









 


शिराळा तालुक्यात असणारे देववाडी गाव तसे सधन गाव. गावचे लोक गुण्यागोविंदाने रहातात. याच देववाडीत निवास उर्फ धनाजी पंडीत खोत हा रहात होता. तो त्याचे आई-वडील, बहीणीसह रहात असे. निवास इयत्ता बारावी पास झाल्यानंतर आयटीआयचा कोर्स करत होता. त्याला त्याच्या वडीलांनी मोबाईल फोन दिला होता. हे आता सर्वत्र दिसणारे चित्र आहे. अभ्यासच ऑनलाईन असल्याने आता शाळकरी मुलांकडेही मोबाईल दिसू लागले आहेत. या मोबाईलचा आणि इंटरनेट डेटाचा वापर शिक्षणासाठीच मुलांनी करावा अशी पालकांची असते. मुले अभ्यास करत असतील असा पालकांचा विश्‍वासही असतो, पण इंटरनेटवर सहजपणे पोर्न उपलब्ध झाल्याने ते मुलांच्या नजरेसमोर येणारच नाहीत असा समज करून घेणे अहिताचे ठरू शकते, त्यामुळे मुलांना शिक्षणासाठी मोबाईल दिला तरी त्याचा वापर पाल्य कसा करतो याची माहितीही पालकांना असली पाहिजे. ती नसले तर मात्र त्या पाल्याच्या आयुष्याची धुळदाण व्हायला वेळ लागत नाही. निवासच्या बाबतीतही तेच झाले. त्याने मोबाईलचा वापर शैक्षणिक कामासाठी न करता वेगळ्याच कामासाठी सुरू केला होता. घरात कोणालाही न कळू देता त्याचे वेगळेच चाळे सुरू असायचे. त्या मोबाईलमधील इंटरनेटचा वापर त्याने पॉर्न फिल्म पहाण्यासाठी केला. रोज रोज कामक्रिडा पाहून त्याच्या मनात विकृत वासना ठासून भरली होती. आई-बापाची नजर चुकवून तो शेतामध्ये आडोशाला बसून पॉर्न फिल्म पहायचा, त्यामुळे दिवसेंदिवस तो विकृत बनत चालला होता.



 


देववाडी गावात शेतामध्ये एकटी महिला दिसली की निवासच्या मनातील विकृती जाग्या व्हायच्या. तो त्या महिलांच्या शरीराकडे कामूक नजरेने पहायचा. त्या महिलांबद्दल घाणेरडे विचार करायचा. एखादी महिला रानात एकटी काम करतांना दिसली की निवास तिच्यासमोर नागवा व्हायचा. सगळे कपडे उतरवून अश्‍लिल इशारे करायचा. विकृत चाळे करायचा. काही महिला त्याला शिव्या देऊन पिटाळून लावत. काही पायातले काढून हात घेत, तर काही महिला आरडाओरडा करत. मग तो घाबरून धूम ठोकायचा. त्याने वारंवार असे प्रकार केले होते. जवळपास असे प्रकार त्याने १० ते १२ वेळा केल्याचे उघड झाले होते. या सार्‍या विकृतीच्या खेळामुळे निवासला गावातील लोकांनी चांगलाच हाणला होता. त्यावेळी त्याच्या बापाने लोकांची माफी मागितली. ‘पुन्हा तो चुकणार नाही, माङ्ग करा’ अशा गयावया केल्या, तेंव्हा लोकांनी त्याला सोडून दिले. लोकांचा मार खाल्ला, बापाला हात जोडण्याची वेळ आली म्हणून काही निवास सुधारला नाही. त्याचा विकृत खेळ सुरूच होता. महिलांना त्याचा त्रास होतच होता. त्याची विकृती वाढत चालली होती. महिलांबद्दल तो अत्यंत घाणेरडे विचार करू लागला होता. महिलांबरोबर अश्‍लिल चाळे करण्याचे, बलात्कार करण्याचे विखारी विचार त्याच्या मनात घोळू लागले. तो वासनेने अंध झालेला सैतानच बनला होता.

या सैतानाचा बळी कोण ठरणार हे मात्र नियतीलाच माहित होते. दि. २१ जानेवारीचा दिवस नेहमीप्रमाणे उजाडला होता. वासनांध, कामपिसाट प्रवृत्तीचा निवास दुपारीच घराबाहेर पडला. त्याला चोरून पॉर्न फिल्म पहायची होती. दुपारच्या वेळी शेतशिवारात लोक नसतात, त्यामुळे तिथे ब्लू ङ्गिल्म पहाता येणार होत्या. तसेच दुपारच्या वेळी एखादी महिला काही कामानिमित्त शेतात येते, तेंव्हा ती एकटीच असते. एखादी एकटी महिला शेतात सापडली तर तिच्यावर अत्याचार करता येईल असा विचारही त्याच्या मनात घोळत होता. तो शेतात एकटी महिला सापडते का याचा अंदाज घेत होता.

त्यावेळी गावातील रूपाली मारूती खोत या पिकाला पाणी पाजण्यासाठी शेतामध्ये गेल्या होता. त्यांच्यासमवेत त्यांचा मुलगा नेहमी असतो, पण आता शाळा सुरू झाल्या होत्या. त्यामुळे मुलगा शाळेत गेला. त्याला शाळेत घालवून रूपाली एकट्याच शेतात आल्या. शेतात जातांना रूपाली यांनी घराशेजारी निरोप दिला की, ‘मुलाची शाळा सुटली की त्याला शेतात पाठवून द्या.’ त्यानंतर त्या शेतात आल्या. मोटर सुरू करायला गेल्या, पण वीज नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने त्या तिथेच एका बाजूस नातेवाईकांशी बोलत बसल्या. थोड्या वेळातच त्यांचा मुलगा तिथे आला. त्यावेळी त्या  मुलास म्हणाल्या. ‘तू थोडा वेळ इथेच थांब. वीज येईलच इतक्यात, म्हणूनच मी बसली आहे.’ तेंव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, ‘आई, माझ्याकडे पाचशे रूपये आहेत. मी मांगलेत जावून चप्पल घेवून येतो.’  तेंव्हा त्यांनी त्याला ‘बरं ये’ असे म्हटले, त्यामुळे मुलगा लगेच तिथून निघून गेला.

रूपाली खोत शेतात एकट्या आहेत, त्यांचा मुलगा नाही हे निवासच्या लक्षात आले. त्याची घाणेरडी नजर त्या बिचार्‍या विवाहितेवर पडली होती. त्याने आसपास कोण आहे का याचा अंदाज घेतला. त्या रणरणत्या उन्हात तिथे कोणीही नव्हते. सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. त्याच्या मनात वासनारूपी श्‍वापद जागे झाले. त्याने अंगावरील कपडे काढले आणि तो रूपाली यांच्या दिशेने येवू लागला. रूपाली यांचे त्याच्याकडे लक्ष गेले. आपल्या दिशेने येणार्‍या निवासकडे पाहून त्याच्या मनात त्याचा काय डाव आहे हे लक्षात आले. त्या आरडाओरडा करू लागल्या, पण त्या परिसरात कोणीच नसल्यामुळे या आरडाओरडीचा काहीच फायदा झाला नाही. त्यांच्या मदतीला कोणी आले नाही. येथे कोण येणार नाही याचा अंदाज नीच निवासला होता. तो तसाच नागवा रूपाली यांच्यावर चालून गेला. त्याच्यापासून बचाव करण्यासाठी रूपाली धावू लागल्या. तसा त्यानेही वेग वाढवला. तोही नागवा धावत त्यांचा पाठलाग करू लागला. धावत-धावतच त्या विहीरीजवळ आल्या. या नराधमानेही त्याठिकाणी त्यांना गाठले. त्याच्यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी त्या त्याला प्रतिकार करू लागल्या, पण त्याच्या अंगात सैतान संचारला होता. त्याने त्यांच्यावर हल्लाच केला होता. दोघात झटापट सुरू झाली. तो रूपाली यांच्याशी झोंबाझोंबी करू लागला. त्या आपली सगळी ताकद वापरून त्याला रोखत होत्या. यामध्ये त्यांच्या बांगड्या फुटल्या, मोबाईलही हातातून कुठेतरी पडला. चप्पल पायातून निसटली होती. त्यांच्या या प्रतिकारामुळे निवासला कार्यभाग साधता येत नव्हता. तो मनातून चिडला. त्यांनी आपल्याला साथ दिली नाही, प्रतिकार केला. आता गावात जाऊन हा प्रकार लोकांना सांगितला तर आपल्याला चोप मिळणार, आपल्याला गावात राहूही देणार नाहीत हे त्याच्या लक्षात आले. वासनांध निवासने रागाने रूपाली खोत यांना विहीरीत ढकलून दिले. मारहाणीने तसेच निवासला प्रतिकार करून त्या थकल्या होत्या. त्यातच त्यांना विहीरीत टाकल्याने विहीरीतील खोल पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. काहीही दोष नसतांना एका विवाहितेचा जीव गेला. एका वासनांध तरूणाच्या नीचपणामुळे एका आईचा बळी गेला.

 


आपल्या हातून भयंकर घडल्याचे निवासच्या लक्षात आले. त्याने लगेच आपल्या अंगावर कपडे चढवले आणि तो पळून जावू लागला. तो पळत जात असतांना रूपाली यांच्या मुलाने पाहिले. गावामध्ये तो कशाबद्दल कुप्रसिद्ध आहे हे माहित असल्याने रूपाली यांच्या मुलाला शंका आली. तो आईला हाका मारतच त्या ज्याठिकाणी बसल्या होती त्याठिकाणी आला, पण त्याठिकाणी त्याची आई त्याला दिसली नाही. आपली आई दिसून येत नाही म्हटल्यावर त्याने आपल्या घरच्यांना याबाबत सांगितले, तेंव्हा रूपाली खोत यांचे नातलग आणि शेजारचे लोक त्यांचा शोध घेवू लागले. त्यांना शेतामध्ये फुटलेल्या बांगड्या, मोबाईल आणि चप्पला दिसून आल्या. तसेच विहीरीमध्ये त्यांचा मृतदेह आढळला.

नेमके काय झाले असावे हे सार्‍यांच्या लक्षात आले होते. या लोकांनी लगेच शिराळा पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली, त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे आपल्या सहकार्‍यांसह देववाडी गावात देसकत शिवारातील नामदेव खोत यांच्या विहीरीजवळ असणार्‍या घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने रूपाली खोत यांचा मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळाचा आणि मृतदेहाचा पंचनामा करून तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या घटनेनंतर उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नराधम निवास उर्फ धनाजी खोत यास ताब्यात घेवून त्याला रितसर अटक केली आहे.

 


रूपाती मारूती खोत यांच्या खुनाबाबत त्यांचे पती मारूती खोत यांनी शिराळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून निवास उर्फ धनाजी पंडीत खोत (वय २०) याच्याविरोधात गुन्हा रजि.नं. १३-२०२१ भा.दं.वि. कलम ३०२, ३५४ (ब), ५०६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. घटनेचे गांभीर्य पहाता शिराळा पोलिसांनी लगेच निवास उर्फ धनाजी पंडीत खोत यास दि. २२ जानेवारी २०२१ रोजी अटक केली. त्याला शिराळा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.



Post a Comment

0 Comments