अंबरनाथ नगरपालिका व पोलीस प्रशासनाची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती
कोरोना संसर्गामुळे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर महाशिवरात्रीला केवळ धार्मिक विधीसाठी खुले राहणार असून भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. अशी माहिती सोमवारी अंबरनाथ नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.
यावेळी अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धिरज चव्हाण, उपमुख्याधिकारी भाऊ निपुर्ते, सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या मनाई आदेशाबाबत माहिती दिली. याप्रसंगी शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे, नगरपालिकेचे अधिकारी महेंद्र नेर, जनसंपर्क अधिकारी वर्षा बांगर आदी उपस्थित होते.
गुरुवार दि. ११ मार्च रोजी महाशिवरात्री साजरी होणार आहे. महाशिवरात्रीला दरवर्षी अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी येतात. दरवर्षी जत्रेचे स्वरूप येते. विविध प्रकारचे लहान-मोठया व्यावसायिकांची दुकाने, खेळणी असे विविध प्रकारचे स्टॉल्स शिवमंदिर परिसरात यात्रेनिमित्त दाखल होतात. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि शासनाच्या गर्दी टाळण्याचे केलेल्या आवाहनानुसार मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या आव्हानानुसार नगरपालिकेने गुरुवारी मंदिर परिसरात मनाई केली आहे. मनाई असल्याच्या कारणामुळे मोजकेच ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पूजा करण्यात येणार आहे. यावेळी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या खबरदारी घेण्याचे आवाहन संबंधितांना करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. दरवर्षीप्रमाणे विविध भागातून येणाऱ्या पालख्या, दिंडी आदीनाही मंदिर परिसरात मनाई करण्यात आली आहे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त सज्ज असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक नरळे यांनी सांगितले.
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महाशिवरात्रीच्या सुमारास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हल देखील यावर्षी रद्द करण्यात आल्याचे फेस्टिव्हलच्या आयोजकांनी सांगितले.
उस्मान शाह, अंबरनाथ
0 Comments