मानकोली ते मोठागाव रस्त्याच्या कामामध्ये बाधित होणारी ठाणे महापालिकेची आणि स्टेम प्राधिकरणाची मोठी जलवाहिनी स्थलांतरीत करावी लागणार असून हे काम करताना भविष्यातील पाणी पुरवठ्याचा विचार करून त्यात वाढीव म्हणजेच २५०० मीमी व्यासाची जलवाहीनी टाकण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
या रस्त्यावर स्टीलचा पुल बांधून त्यावरून जलवाहीन्या टाकण्यात येणार आहेत. या कामासाठी १८ कोटी २४ लाख रुपयांचा खर्च येणार असून हा संपुर्ण खर्च एमएमआरडीए उचलणार आहे. त्यामुळे महापालिकेला वाढीव व्यासाच्या जलवाहिनीसाठी एक रुपयाही खर्च करावा लागणार नसल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये विविध स्त्रोतांमार्फत दररोज ४८० दशलक्षलीटर इतका पाणी पुरवठा करण्यात येतो. त्यामध्ये स्टेम प्राधिकरण, एमआयडीसी, महापालिकेची स्वत: ची योजना आणि मुंबई महापालिका या स्त्रोतांचा समावेश आहे. हे स्त्रोत भातसा तसेच उल्हासनदीच्या पात्रातून पाणी उचलून त्याचा ठाणे शहरात पुरवठा करतात. त्यासाठी नदीपात्रापासून ते शहरापर्यंत मोठ्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. अशाचप्रकारे मानकोली परिसरात महापालिकेच्या स्वत:च्या योजनेची २०४४ मीमी व्यासाची तर स्टेमची १५३० मीमी व्यासाची जलवाहिनी आहे. या दोन्ही वाहिन्या मानकोली ते मोठागाव रस्त्याच्या कामामध्ये बाधित होत आहेत. त्यामुळे एमएमआरडीएने महापालिकेला एक पत्र पाठविले होते. त्यामध्ये दोन्ही जलवाहिन्या स्थलांतरीत करण्याचे काम करण्यास आणि त्यासाठी येणारा खर्च देण्यासंबंधी कळविले होते. त्यानुसार महापालिका प्रशासनाने दोन्ही जलवाहिन्या स्थलांतरीत करण्याच्या कामाचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. त्यामध्ये जलवाहिन्या स्थलांतरीत करताना भविष्यातील पाणी पुरवठ्याचा विचार करून त्या वाढीव म्हणजेच २५०० मीमी व्यासाची जलवाहीनी टाकण्याचे प्रशासनाने प्रस्तावित केले आहे. या कामासाठी १४ कोटी ८२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हि रक्कम एमएमआरडीएकडून प्राप्त झाल्यानंतर या कामाची निविदा काढण्यात येईल आणि त्यानंतर जलवाहिन्या स्थलांतरीत करण्याचे काम करण्यात येईल, असे पालिकेने प्रस्तावात म्हटले आहे. याशिवाय, जलवाहिन्यांसाठी स्टीलचा पुल बांधण्यात येणार असून त्यासाठी २ कोटी ९९ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच व्हॉल्व चेंबर्सचे बांधकामही करण्यात येणार असून त्यासाठी ३८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हि दोन्ही कामे एमएमआरडीए करणार आहे. त्यामुळे या कामासाठी जीएसटीसह एकूण १८ कोटी २४ लाख रुपये खर्च येणार आहे.
0 Comments