होळी सणाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्र निर्माण होऊ नये, यासाठी २२ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी निर्बंध जारी करण्यात आले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.रविवारी होळी, दुसऱ्या दिवशी धुलिवंदन आणि २ एप्रिलला रंगपंचमी आहे. सार्वजनिक ठिकाणी झाडे तोडणे, जाळणे, पादचाऱ्यांवर कोरडे अथवा पाणीमिश्रित रंग उडवणे, पाण्याचे फुगे फेकून मारणे, असे प्रकार घडतात.
अनेकदा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये रंगीत पाणी भरून नागरिकांना लक्ष्य केले जाते. अशा प्रकारांमुळे घाव वर्मी लागून व्यक्ती जखमी होण्याची शक्यता असते. पाण्याच्या फुग्यांचा मारा चुकविण्याच्या प्रयत्नांत अपघात होतात. अनेकदा या सणानिमित्त महिलांना लक्ष्य केले जाते. होळीच्या सणाआडून त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न रोडरोमियो करतात. 'बुरा न मानो' म्हणत सार्वजनिक जागेत अश्लील शब्द उच्चारणे, गाणी म्हणणे, घोषणा देणे, विकृत हावभाव करणे, आदी प्रकार निषिद्ध मानण्यात आले आहेत. ठाणे जिल्ह्यात सर्वत्र पोलिस पथके गस्त घालणार असून होळीच्या निमित्ताने कुणीही गैरवर्तन करताना आढळून आल्यास त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
0 Comments