-->

Ads

पत्नीची कात्रीनं गळा चिरुन निर्घृण हत्या, न्यायालयानं आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा

 फरीदाबाद 18 मार्च : हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यातील एका भयंकर घटनेवर न्यायालयानं निर्णय सुनावला आहे. एका व्यक्तीनं स्वतःच्याच पत्नीची कात्रीनं गळा चिरुन निर्घृण हत्या (Husband Killed his Wife) केली होती. यातील आरोपीला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. सोबतच आरोपीला वीस हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. या आरोपीनं अत्यंत निर्घृण पद्धतीनं हत्या (Murder) केली होती. त्यानं पत्नीवर तोपर्यंत वार केले जोपर्यंत तिचं शीर धडावेगळं झालं नाही.

न्यायालयानं म्हटलं, की हत्येची पद्धत अत्यंत विचित्र आहे. अशा व्यक्तीचं जिवंत राहाणं समाजासाठीदेखील चांगलं किंवा सुरक्षित नाही. याप्रकरणी 17 मार्च 2018 रोजी गुरुग्राम येथील रहिवासी बृज शर्मा यांनी सूरजकुंड ठाण्यात तक्रार दाखल केली होती. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, बृज शर्मा यांची बहिण अंजूचं लग्न 17 वर्षाआधी हरीनगर आश्रम नवी दिल्ली येथील रहिवासी संजीव कौशिकसोबत झालं होतं. संजीव कौशिक दिल्‍ली नगर निगममध्ये नोकरी करत होता. या घटनेच्या काही दिवस आधीच तो ग्रीन फील्ड कॉलनीमध्ये येऊन राहात होता.या दाम्पत्याला एक मुलगाही आहे, याचं वय पंधरा वर्ष आहे. संजीव कौशिक नेहमी आपली पत्नी अंजूच्या चारित्र्यावर संशय घेत असे. याच कारणावरुन अनेकदा त्यानं पत्नीला मारहाणही केली. 17 मार्च 2018 लाही दोघांमध्ये भांडण झालं. यावेळी त्यांचा मुलगा ग्रीन फील्ड कॉलनीमधीलच आपल्या नातेवाईकाच्या घरी गेला होता. याचवेळी रागात संजीवनं आपल्या पत्नीचं शीर धडापासून वेगळं केलं. इतकंच नाही तर कात्रीनं तिच्या डोक्याचेही तुकडे केले.

आरोपीनं महिलेच्या शरीराचे तुकडे एका पिशवीमध्ये भरुन लाजपत नगर फ्लायओव्हरवर टाकले. थोड्यावेळात मुलगा घरी पोहोचला तेव्हा दरवाजाला कुलूप लावलेलं होतं. त्यानं आपल्या नातेवाईकाला याबद्दल माहिती दिली. यानंतर पोलिसांना बोलावण्यात आलं. पोलिसांनी दरवाजा खोलला तेव्हा, आतमध्ये अंजूचा धडावेगळा झालेला मृतदेह त्याठिकाणी होता. यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं. तेव्हापासूनच हे प्रकरण न्यायालयात होतं.



Post a Comment

0 Comments