उत्पन्न वाढीसाठी ठाणे महापालिका आता ढाबे, लॉन्स, ओपन स्पेससह रस्त्यावरील पार्किंगवर करआकारणी करणार आहे. स्थायी समितीनेच ही नवी करवाढ सुचविली आहे. शिवाय ज्याची मंजुरी दिली त्याच आकाराचा जाहिरात फलक लावण्याची सूचना करून जाहिरात संस्थांना चाप लावला आहे. मंगळवारी महासभेस सादर केलेल्या अर्थसंकल्पात स्थायी समितीने ही नवी करवाढ सुचविली आहे.
कोरोनामुळे बांधकाम व्यावसायिकांना फटका बसला असला तरी ही परिस्थिती सुधारणार असल्याने शहरविकास विभागाकडून जास्तीचे उत्पन्न गृहीत धरले आहे. तर परिवहन सेवेसाठी ३५ कोटींची वाढ प्रस्तावित केली आहे.
रस्त्यांचे बांधकाम करण्यासाठी अंदाज खर्च तयार करताना त्यामध्ये पाणीपुरवठा, विद्युत व मलनि:सारण या विभागाकडील कामांचा समावेश करून रस्ते बांधकामांचा एकत्रित अंदाज खर्च तयार करावा, असे सुचविले आहे.
महापालिकेच्या ज्या शाळांमध्ये पटसंख्या जास्त आहे, त्या शाळा प्रथम टप्प्यात डिजिटल कराव्यात, शाळा दुरुस्तीसाठी १६ कोटी, बालवाड्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित केली असून तर नवीन शाळा बांधकामांसाठी १३ कोटी ७१ लाखांची भरघोस तरतूद केली आहे. महिला बालकल्याण कार्यक्रमासाठी महापालिका आयुक्तांनी प्रस्तावित तरतूद कमी केली होती. ती आता पुन्हा २५ कोटी रुपये केली आहे.
त्याचबरोबर दिव्यांग कल्याणकारी योजनेसाठी १७ कोटी रुपये, महिलांसाठी सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र कक्ष तयार करून खोली तीच्यासाठी ही संकल्पना राबविण्यासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद प्रस्तावित केली आहे.
0 Comments