नवरा- बायकोमध्ये सुरु असलेल्या वादाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.त्याने सासुरवाडीत अंधाधुंद गोळीबार (Firing) केला. यामध्ये पत्नी (Wife) आणि सासु सासऱ्याचा मृत्यू झाला आहे.
जम्मू, 10 मार्च : नवरा- बायकोमध्ये सुरु असलेल्या वादाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. त्याने सासुरवाडीत अंधाधुंद गोळीबार (Firing) केला. यामध्ये पत्नी (Wife) आणि सासु सासऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याने जवळपास एक डझन गोळ्या झाडल्याची माहिती आहे. या पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. 'ड्यूटी संपल्यानंतरही हत्यार घेऊन त्याला कसे जाऊ दिले? असा प्रश्न नातेवाईकांनी विचारला आहे.
जम्मू (Jammu) जिल्ह्यातील सतवारीमधील हे धक्कादायक प्रकरण आहे. राजेंद्र कुमार उर्फ रवी असे या प्रकरणातील आोरोपी पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो मंगळवारी रात्री त्याच्या सासुरवाडीत गेला होता. घरामध्ये जाताच त्याने उपस्थित सर्व व्यक्तींवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या सासू राज कुमारी यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी सीमा देवी आणि सासरे राकेश कुमार गंभीर जखमी झाले. त्या दोघांचा हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.
राजेंद्रने यावेळी दोन्ही मेव्हणे आणि चुलत सासऱ्यांवरही गोळीबार केला होता. मात्र ते घरातील खोलीमध्ये लपून बसले होते. त्यानंतरही त्याने त्यांच्या खोलीच्या खिडकीवर गोळीबार केला. गोळीबार केल्यानंतर राजेंद्र कारमध्ये बसून फरार झाला. पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी अनेक ठिकाणी सर्च ऑपरेशन करत राजेंद्रला अटक केली.
मिठाई देऊन घरात शिरला
मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्रनं घरात गोळीबार केला तेंव्हा घरामध्ये दोन मुलं देखील उपस्थित होते. त्याने घरात जाण्यापूर्वी आपल्या चुलत सासऱ्याला घरात सर्व जण आहेत का? असे विचारले होते. आपले प्रमोशन झाले असे सांगून राजेंद्रने त्यांना मिठाई देखील दिली आणि नंतर त्याने घरात प्रवेश केला.
राजेंद्रचा त्याच्या पत्नीसोबत बऱ्याच काळापासून वाद सुरु होता. त्याच्या मारहाणीला कंटाळून पत्नी माहेरी राहत होती. त्यामुळे संतापलेल्या राजेंद्रनं हा गोळीबार केल्याची माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. या प्रकरणात राजेंद्रच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास करण्यात येत आहे.
0 Comments