-->

Ads

 

राज्यात भाजपच्या अडचणी वाढणार?

'जलयुक्त शिवार'च्या खुल्या चौकशीसाठी समिती गठीत


मुंबई, 1 डिसेंबर : जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिल्यानंतर आता याप्रकरणी समिती गठीत करण्यात आली आहे.

भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रीम योजना म्हणून जलयुक्त शिवार योजना ओळखली जाते. मात्र याच योजनेची आता खुली चौकशी होणार असल्याने भाजपच्या अडचणी वाढणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

जलयुक्त शिवार योजनेच्या कोणत्या कामांची खुली चौकशी व्हावी, हे ठरवण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. कामं खूप असल्याने नेमक्या कोणत्या कामांची चौकशी करायची, याबाबत ही समिती आपलं मत देणार आहे.

समितीत कोणाचा समावेश?

1. विजय कुमार, सेवानिवृत्त अप्पर सचिव

2. अतिरिक्त पोलीस महासंचालक, एसीबी

3. संजय बेलसरे, मुख्य अभियंता जलसंपदा

4. कार्यरत संचालक, मृदसंधारण आणि पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन

समिती नेमकं काय काम करणार?

या समितीने 13 जिल्ह्यातील 120 गावातील 1128 कामांपैकी कोणत्या कामांची चौकशी खुल्या पद्धतीने व्हावी हे ठरवायचं आहे. जर ती फक्त प्रशासकीय / विभागीय चौकशी असेल तर तर संबंधित विभागाला कळवावी. 2015 पासून प्राप्त 600 अधिक तक्रारींची छाननी करावी. या समितीला 6 महिन्याचा अवधी असणार आहे. दर महिन्याला समितीने कोणत्या शिफारशी केल्यात त्यांचा अहवाल सरकारला दावा लागणार आहे.

नेमका काय आहे ठाकरे सरकारचा निर्णय?

जलयुक्त शिवार योजनेची एसआयटीमार्फत खुली चौकशी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने ऑक्टोबरमध्ये निर्णय घेतला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलयुक्त शिवार योजनेची चौकशी करण्याची मागणी काही मंत्र्यांनी केली होती. कॅगने या योजनेवर ताशेरे ओढले होते, त्या अनुषंगाने चौकशी होणार आहे. जलयुक्त शिवार योजनेसाठी 9 हजार कोटी खर्च झाला, मात्र त्याचा फायदा झाला नाही, असा आरोप आहे. योजना राबवूनही राज्यात टँकरची संख्या वाढली, मात्र भूजल पातळी वाढली नाही.

प्रतिनिधी राहुल भोईर 

Post a Comment

0 Comments