राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबईसह मोठ्या शहरातील आगार आणि एसटीची मालमत्ता हजारो कोटींच्या घरात आहे.
आर्थिक अडचणीचा सामना करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाने आता मोठे कर्ज घेण्याचा निर्णय घेणार आहे. महामंडळाची मुंबईसह मोठ्या शहरातील आगार आणि एसटीची मालमत्ता हजारो कोटींच्या घरात आहे. ही मालमत्ता तारण ठेवण्यात येणार आहे. त्या बदल्यात 2 हजार कोटींचं कर्ज घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या कर्जासाठी 20 कोटी रुपयांचा मासिक व्याज एसटीला द्यावा लागणार आहे.
राज्य सरकारने पुढील पगारासाठी पैसे देण्यास असमर्थता दाखवल्याने एसटी महामंडळाला हा पर्याय निवडावा लागणार आहे. यासाठी राज्य शासनाने हमी घ्यावी, हा पर्याय पण निवडला जाणार आहे. राज्य सरकारकडून याआधीही एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला होता.
दिवाळी सणातील STची हंगामी तिकीट दरवाढ रद्द
दरम्यान, एसटी महामंडळाच्या हंगामी तिकीट दरवाढ रद्द करण्याच्या निर्णयाला राज्य परिवहन प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या मंजुरीनुसार, यात्रा, सणासुदीचा काळ, सलग सुट्ट्या, सप्ताह अखेर अशा गर्दीच्या काळात महसूल वाढीचा स्रोत म्हणून 30 टक्केपर्यंत हंगामी दरवाढ करण्याचे अधिकार एसटी महामंडळाला आहेत.
त्यानुसार दरवर्षी दिवाळी सुट्टीच्या कालावधीत सर्व बससेवा प्रकारासाठी 10 ते 15 टक्केपर्यंत तिकीट दरवाढ करून अतिरिक्त महसूल प्राप्त करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या संकटात सर्वसामान्य प्रवाशांना अतिरिक्त आर्थिक भुर्दंड पडू नये, म्हणून सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत, दिवाळी सुट्टीच्या कालावधीतील अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे.
गेली अनेक महिने आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाने अशा बिकट परिस्थितीमध्ये अतिरिक्त तिकीट दरवाढ रद्द करून आपल्या 'प्रवासी देवो भवः'या भूमिकेला साजेसा निर्णय घेऊन प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले.
0 Comments