मराठीतील ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी केतकी चितळे हिच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई, 12 जुलै : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एका कॉमेडियनने वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर चौफेर टीका झाली. मात्र त्यानंतर मराठी अभिनेत्री केतकी चितळे हिने आक्रमक फेसबुक लिहित कॉमेडियनवर टीका करणाऱ्यांचाच समाचार घेतला. आता या पोस्टवरून मराठीतील ज्येष्ठ निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी केतकी चितळे हिच्यावर निशाणा साधला आहे.
'मराठीमध्ये एक केतकी नावाची एक अभिनेत्री आहे, जी तिच्या पोस्टमधून समाजामध्ये तिढा, द्वेष कसा निर्माण होईल, याचाच प्रयत्न करत आहे. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये तिने महाराष्ट्राचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला. जो मलाच नाही तर अनेकांना खटकला आहे,' अशा शब्दांत महेश टिळेकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना महेश टिळेकर यांनी केतकीला आक्रमक शब्दांमध्ये फटकारलं आहे.
महेश टिळेकर म्हणतात की, 'केतकीने असंही लिहिलं आहे की, आजची ही जी तरूण पीढी आहे ती कुठेही कामधंदा मिळत नाही, म्हणून शिवाजी महाराजांच्या नावाचा मराठी असल्याचा गैरफायदा घेत आहेत. मला हे केतकी बाईला हेच विचायचं आहे की, जेव्हा महाराष्ट्रावर जेव्हा मोठं संकट येतं, तेव्हा हीच तरूण पीढी पुढे येतं. तेव्हा त्यांचं या केतकीने कधी कौतुक केलं आहे का?
या अभिनेत्रीने आणखी एक आरोप केला आहे की या तरूण पीढीने शाळेत जाऊन अभ्यास करावा...फुले, आंबेडकर यांचा अभ्यास करावा. पण याच केतकीने काही महिन्यांपूर्वी एका समाजाबद्दल वादग्रस्त पोस्ट केली होती. या केतकीचा मेंदू नक्कीच गुडघ्यात असावा,' अशा शब्दांत टिळेकर यांनी केतकीवर खरमरीत टीका केली आहे.
काय होती केतकीची फेसबुक पोस्ट?
'3 वर्षाच्या मुलाची बौद्धिक पातळी असलेले स्वघोषित मावळे, शिवाजी हा एक शब्द ओळखतात आणि महाराजांच्या शिकवणीला फाट्यावर मारून, महाराजांच्या नावावर राजकारण करायचा पोकळ विनोद सुरू करतात. बरं, अशा वागण्यानी आपण आपली लायकी दाखवून देतोय हे त्यांच्या लक्षात येत नाहीच. अर्थात हे कळण्यासाठीही नखाएवढी अक्कल लागतेच म्हणा,' असं केतकीने आपल्या फेसबुक पोस्टमधून सोशल मीडियावर राग व्यक्त करणाऱ्यांवर टीका केली होती.
0 Comments