अभिनेत्री संध्या मृदुलचेही 'बाबूजीं'वर आरोप
मुंबई, १० ऑक्टोबर : लेखिका, दिग्दर्शक विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप केल्यानंतर आता संध्या मृदुल या अभिनेत्रीनेही आपल्यावर आलोकनाथ कसे जबरदस्ती करायचे याबाबत जाहीर आरोप केले आहेत. शूटिंगच्या ठिकाणी रात्री-अपरात्री दारूच्या नशेत आलोकनाथ आपल्या रूमवर येऊन जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायचे आणि त्यांच्यामुळे आपण प्रचंड मानसिक दबावाखाली होतो, असं संध्यानं लिहिलंय.
याबाबत अलोकनाथ यांची प्रतिक्रिया अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यावर बातमी अपडेट करण्यात येईल.
दरम्यान आलोकनाथ यांचे वकील अशोक सरावगी यांनी नेटवर्क18च्या प्रतिनिधी विनया देशपांडे यांच्याशी बोलताना सांगितलं की, अलोकनाथ विनता नंदा आणि संध्या मृदुल दोघींविरोधात बदनामीचा खटला दाखल करणार आहेत. हे आरोप करण्यासाठी त्या १९ वर्षं का थांबल्या, असा सवालही त्यांनी केलाय. आलोकनाथ दोघींनाही कायदेशीर नोटिस पाठवणार असल्याचं हे वकील म्हणाले.
संध्यानं नेमकं काय लिहिलंय?
ती माझ्या करिअरची सुरुवात होती आणि अलोकनाथ बरोबर मी एक टेलिफिल्मच्या शूटसाठी कोडाईकॅनालला गेले होते. अलोकनाथ माझ्या वडिलांच्या भूमिकेत तर रीमा लागू आईच्या भूमिकेत होत्या. त्यावेळी अलोकनाथ माझ्या कामाचं सेटवर भरभरून कौतुक करायचे. अभिनयाची देणगी लाभल्याचं सांगायचे. मला छान वाटायचं.
एकदा रात्री लवकर पॅकअप झाल्यानंतर सगळी टीम डिनरला गेली होती. तिथे अलोकनाथ प्रचंड दारू प्यायले आणि त्यांनी माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तू माझी आहेस, असं बरळायला लागले. माझ्या सहकार्यांनी परिस्थिती ओळखून त्यांना दूर केलं आणि आम्ही सगळे डिनर न घेताच परतलो. पण त्या रात्री पुन्हा एकदा माझ्या रूमवर टकटक झाली. मला वाटलं दुसऱ्या दिवशी सकाळच्या शूटिंगसाठीचे कपडे द्यायला देणारा कॉस्च्युम दादा असेल, म्हणून मी दार उघडलं तर तशाच दारूच्या नशेत असलेले अलोकनाथ दारातून थेट आत घुसले आणि त्यांनी पुन्हा मोठमोठ्यानं तू माझी आहेस, असं म्हणत जबरदस्ती करायचा प्रयत्न केला. मी कशीबशी तिथून सटकले. नशिबाने हॉटेलच्या रिसेप्शनवरच आमचे DoP (डिरेक्टर ऑफ फोटोग्राफी) भेटले. त्यांना घेऊन मी रूमवर आले, तरीही अलोकनाथ तिथेच होते आणि त्यांनी माझी रूम सोडायला नकार दिला. मोठमोठ्याने ओरडत ते धमक्या देत होते. शेवटी आम्ही कसंतरी त्यांना खोलीतून बाहेर काढलं. माझ्या खोलीत सोबत म्हणून त्या रात्री हेअर ड्रेसर झोपायला आली. पण मी या प्रसंगाने पुरती हलले होते. दुसऱ्या दिवशी फिल्ममध्ये मी बापाच्या म्हणजे अलोकनाथच्या मांडीवर बसते, असा प्रसंग होता. माझ्यात तो करायचं धैर्यच राहिलं नाही.
नंतर अलोकनाथांनी मला गाठून माझी क्षमा मागितली. दारूच्या नशेत होतो. त्यामुळे असं झालं. माझं कुटुंब मला दुरावलंय. मी आता सुधारणार, मदत घेणार, असंही ते म्हणाले.
नंतरही त्या टेलिफिल्मचं शूट सुरू होतं तेव्हा अलोकनाथ रात्री अपरात्री दार वाजवायचे. मला प्रचंड भीती वाटायची. तो संपूर्ण काळ मी दहशतीखाली होते. पण माझे इतर सहकारी, DoP आणि आईसारख्या जपणाऱ्या स्वर्गीय रीमा लागू यांच्यामुळे आणखी काही घडलं नाही. पण मुंबईत परत आल्यानंतर ते माझ्याबद्दल मी कशी उर्मट आहे, अॅटिट्यूड आहे, असं सांगायचे. मी त्या वेळी इंडस्ट्रीत नवी होते आणि अलोकनाथांचं नाव मोठं होतं.
मी अलोकनाथला त्या वेळी माफ केलं. कारण माझ्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. पण त्यानं विनताबरोबर जे केलंय, त्यासाठी त्याला माफी मिळणार नाही. ते भयंकर आहे. मी विनिताबरोबर आहे.
अशा अनेक जणी असतील, ज्यांचे अनुभव भयंकर असतील. पण त्यांचं ऐकणारं कोणी नसेल. त्यांनीही पुढे येऊन बोलायला हवं. माझ्या बाबतीत जे झालं त्या वेळी हे सगळं जाहीर करायला सोशल मीडिया नव्हता. पण लैंगिक शोषणाविरोधात आता गप्प राहून चालणार नाही.
0 Comments