उद्धव ठाकरेंच्या 'दिल्ली वारी'नंतर 'वर्षा'वर महत्त्वपूर्ण बैठक, शरद पवारही उपस्थित
,22 फेब्रुवारी: CAA आणि NPR च्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'वर्षा' या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. विशेष म्हणजे या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित आहेत. शरद पवार दुपारी चारच्या सुमारास वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी CAA आणि NPR बद्दल गैरसमज पसरविला जात असल्याचे म्हटले आहे. यात घाबरण्यासारखे काहीही नाही असेही ते म्हणाले. आसामनंतर इतर कुठल्याही राज्यांमध्ये NRC राबवली जाणार नाही, असे पंतप्रधानांनी सांगितल्याची माहितीही त्यांनी दिली. उद्धव ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना हा विषय समजावून सांगावा लागेल. हे एवढे साधे सोपं नाही असेही ते म्हणाले. यावरुन काँग्रेस आणि शिवसेना आमने-सामने आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेनंतर महाविकास आघाडीत तूतू-मैमै
उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन माध्यमांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी CAA बाबत सकारात्मक भूमिका मांडली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनंतर महाविकास आघाडीत तूतू-मैमै सुरू झाल्याची चर्चा आहे. काँग्रेसने सीएए, एनआरसी आणि एनपीए कायद्याला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यामुळे या कायद्यावरुन आघाडीतील सत्ताधारी तीनही पक्षांच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे.
सोमवारपासून विधिमंडळाचे आधिवेशन..
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला येत्या सोमवारपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. शिवाय अधिवेशनात कोणकोणत्या मुद्द्यावर चर्चा व्हावी, विरोधकांचा सामना कसा करावा, याबाबतची रणनीतीही या बैठकीत ठरू शकते, अशी माहिती मिळाली आहे.
0 Comments