ममता दीदींचा राज ठाकरे पॅटर्न, बंगालमध्ये राहायचं तर 'बांग्ला' आलंच पाहिजे
'देशातल्या इतर राज्यांमधून बंगालमध्ये येऊन कायदा आणि सुवव्यस्थेची स्थिती कुणालाही बिघडवता येणार नाही.'
कोलकाता,14 जून : लोकसभेत सपाटून मार खाल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता बंगालच्या अस्मितेच्या मुद्याला हात घातलाय. 'बांग्ला' फर्स्टचा नारा देत त्यांनी बंगालमध्ये राहायचं असेल तर तुम्हाला 'बांग्ला' आलंच पाहिजे असं म्हटलं आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही महाराष्ट्रात राहणाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे असा नारा दिला होता. मात्र मनसेच्या या आंदोलनाचा प्रभाव आता राहिला नाही.कोलकात्यात झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, मी ज्या राज्यात राजे तेव्हा तिथली भाषा बोलते. बंगलामध्ये राहणाऱ्यांनी 'बांग्ला' बोललच पाहिजे. राज्यात कायदा आणि सुवव्यस्थेची स्थिती कुणालाही बिघडवता येणार नाही. देशभरातून अनेक समाजकंटक कोलकात्यात येतात आणि फिरतात हे मी चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
लोकसभेच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारलीय. तृणमूलच्या गडाला खिंडार पाडत भाजपने पश्चिम बंगालमधल्या एकूण 42 लोकसभा जागांपैकी तब्बल 18 जागा जिंकल्या तर तृणमूल काँग्रेसला फक्त 22 जागांवर समाधान मानावं लागलं. 2014मध्ये भाजपला फक्त 2 जागा मिळाल्या होत्या तर तृणमूलला 34 जागा मिळाल्या होत्या.
तृणमूलचे अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्येही जोरदार संघर्ष सुरू असून त्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय.
डॉक्टरांचं आंदोलन चिघळलं
पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांना झालेल्या मारहाण प्रकरणाची दखल आता कोलकाता उच्च न्यायालयानं घेतली आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमधील 126 डॉक्टर्सनी आपला राजीनामा दिला आहे. संपावर असलेल्या डॉक्टरांसोबत बोलणी करा आणि प्रकरण मिटवा असे आदेश कोलकाता उच्च न्यायालयानं ममता बॅनर्जी सरकारला दिले आहेत. डॉक्टरांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे रुग्णांचे प्रचंड हाल झाले आहेत. रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचं चित्र दिसून येत आहे. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली. त्याला आता महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश या राज्यांमधून देखील साथ मिळत आहे. देशभरात डॉक्टरांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे AIIMS सारख्या रूग्णालयांमध्ये देखील रुग्णांची गर्दी झाल्याचं पाहायाला मिळत आहे.
0 Comments