पुण्यात काँग्रेसचा सावळा गोंधळ, घोषणा नाही मात्र उमेदवाराचा प्रचार सुरू
पुण्यात भाजपचा जोरात प्रचार सुरू झाला तर काँग्रेसला उमेदवारच सापडत नाही अशी स्थिती आहे.
पुणे 28 मार्च : पुण्याचा उमेदवार निवडण्यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला घोळ अजुन संपलेला नाही. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव काँग्रेसने निश्चित केलंय पण त्याच्या नावाची अधिकृत घोषणा अजुन झालेली नाही. गेली काही दिवस काँग्रेसचा उमेदवार कोण याचीच चर्चा सुरू होती. दिल्लीतल्या श्रेष्ठींनी आपलं मत शिंदे यांच्या पारड्यात टाकल्याने त्यांची उमेदवारी पक्की झाली अशी माहिती सूत्रांनी दिली. घोषणा अजुन होत नसली तरी स्वयंघोषीत उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केलीय.
दिल्लीतून दोन निरिक्षक पाठवून काँग्रेसने अंतर्गत सर्व्हेही केला होता. त्यानंतर अरविंद शिंदे, मोहन जोशी, प्रवीण गायकवाड या तिघांची नावे दिल्लीत पाठविण्यात आली होती. यातून अरविंद शिंदे यांचं नाव निश्चित झालं मात्र घोषणा अजुन झालेली नाही. तरी शिंदेंनी गुरुवारपासून प्रचाराला सुरुवातही केली आहे.
उमेदवारच सापडेना?
लोकांच्या भेटीगाठी घेण आणि मान्यवरांना भेटणं शिंदे यांनी सुरू केलंय. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांची शिंदे यांनी भेट घेतली आणि चर्चा केली. आपल्यालाच उमेदवारी मिळेल याची त्यांना पूर्ण खात्री आहे.
तर दुसरे इच्छुक उमेदवार मोहन जोशी हेही प्रचाराला लागणार आहेत. त्यांनाही उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर तिसरे उमेदवार प्रविण गायकवाड यांनी काँग्रेसच्या घोळाला कंटाळून माघार घेत असल्याचं जाहीर केलं. उर्मिला मार्तोंडकरला काँग्रेसमध्ये सन्मानाने आणलं जातं तर लाखांचे मराठा मोर्चे काढणाऱ्यांना अशी मागणूक दिली जाते अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. तर दुसरीकडे भाजपने प्रचाराला जोरात सुरुवातही केली आहे.
भाजपचा प्रचार सुरू
भाजपने पुण्यातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी दिली आहे. बापट यांनी प्रचाराला सुरुवातही केलीय. मात्र काँग्रेसचा घोळ संपण्याची चिन्हे नाहीत. पुण्यात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यात राज्यातल्या 14 मतदारसंघात निवडणूक होणार आहे.
0 Comments