-->

Ads

भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका 



पाकिस्तानच्या ताब्यात असणारे भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका करणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. पाकिस्तानच्या संसदेत त्यांनी ही घोषणा केली. उद्या शुक्रवारी सकाळी भारतीय वैमानिक अभिनंदन यांची सुटका केली जाईल, असे त्यांनी सांगितले. शांततेच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारतीय पायलटची सुटका करण्यात येणार असल्याचे इम्रान खान यांनी सांगितले. 

भारतीय पायलटची बिनशर्त त्वरित सुटका व्हायला हवी. कोणताही तह वगैरे करण्याचा प्रश्नच नाही, असा इशारा भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला दिला होता. पाकिस्तानच्या विमानांनी बुधवारी भारतीय क्षेत्रात घुसून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय हवाई दलाच्या जेट विमानांनी हा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत पाकिस्तानचं एफ-१६ जेट विमान भारताने पाडलं. या कारवाई दरम्यान भारताचं एक विमान मिग २१ पडलं आणि त्याचे पायलट विंग कमांडर अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतलं होतं. 

यानंतर दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला होता. आपल्या पायलटची सुटका करण्यासाठी भारत एखादी मोठी कारवाई करू शकतं अशी पाकिस्तानला भीती होती. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत केलेल्या भाषणातही ही भीती स्पष्ट दिसत होती. 'भारताला आम्ही काल निरोप दिला. पंतप्रधान मोदींशी संवाद साधण्याचाही प्रयत्न केला. जगातील अन्य देशांशी बोलून तणाव निवळण्याचे प्रयत्न केले,' असे इम्रान खान म्हणाले. भारताकडून क्षेपणास्त्र हल्ला होण्याचीही शक्यता काल रात्री पाकिस्तानने वर्तवली होती, असेही इम्रान म्हणाले.

Post a Comment

0 Comments