पंढरपुरात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार, सभेची उत्सुकता शिगेला
सोमवारी होणार्या उद्धव ठाकरेंच्या महासभेकडे केवळ महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. राम मंदिर, दुष्काळ आणि संपूर्ण कर्जमाफी हे शिवसेनेच्या अजेंड्यावरचे विषय आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सोमवारी कोणावर तोफ डागणार याविषयी राम भक्त, शेतकरी, कष्टकरी, शिवसैनिक, वारकरी संप्रदाय आणि साधू-महंतांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून उद्याची महासभा ही रेकॉर्डब्रेक असेल आणि उद्या आषाढी वारी भरेल असा आत्मविश्वास शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केला.
महासभेच्या नियोजनाची माहिती देण्यासाठी शिवसेना नेत्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. याप्रसंगी खासदार संजय राऊत, राज्याचे बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, खा.अनिल देसाई, खा.अरविंद सावंत, आमदार तानाजी सावंत, रवींद्र निर्लेकर, मीनाताई कांबळी, संजना घाडी, विशाखा राऊत, संतोष माने, संभाजी शिंदे जिल्हा प्रमुख गणेश वानकर संपर्क प्रमुख महिला आघाडी संजनाताई घाडी, जिल्हा महिला आघाडी प्रमुख शैला गोडसे जिल्हा महिला संघटक अस्मिता गायकवाड, शैलाताई स्वामी महिला सन्मवयक सोलापूर जिल्हा, उज्वला येलूरे महिला आघाडी संघटक, साईनाथ अभंगराव उपजिल्हा प्रमुख, सुधीर अभंगराव शहर प्रमुख रवि मुळे तालुका प्रमुख, महावीर देशमुख,अतुल राजूरकर युवासेना संहसंपर्क प्रमुख विनोद कदम आदी उपस्थित होते.
यावेळी कदम म्हणाले, “राममंदिराचा प्रश्न हा शिवसेनेने ऐरणीवर आणला आहे. यासाठी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी अयोध्येचा दौरा केला देशभरातून प्रतिसाद मिळाला आहे. आता याच प्रश्नांवर ठाकरे दक्षिण काशी असणार्या पंढरपूर मधून एल्गार पुकारत असून राज्याचे व देशाचे आता या तीर्थक्षेत्राकडे आहे. गेली तीस वर्षे हा प्रश्न प्रलंबित आहे. राममंदिर उभारणीसाठी विटा देखील गोळा करण्यात आल्या पण अद्याप मंदिर झालेले नाही.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार भाजपाच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आल्यावर कायदा करून राममंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा करता आला असता पण अद्याप हे पाऊल उचलले नाही. भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यात नेहमीच मंदिराचा प्रश्न पहिल्या दहामध्ये राहिला आहे मात्र आता ते सत्तेत असून ही मंदिरासाठी कायदा का करीत नाहीत?” असा सवाल रामदास कदम यांनी केला.
ते म्हणाले, “भाजपने जनतेचाच नाही तर त्यांना सत्तेत आणणार्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ही विश्वासघात केला आहे. आता राममंदिर उभारणीसाठी शिवसेनेने पहिले मंदिर फिर सरकारचा नारा दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे सोमवारी २४ रोजी पंढरीत येत असून ते सायंकाळी चार वाजता चंद्रभागा मैदानात आयोजित महासभेस संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी वारकरी संप्रदायातील हभप देवदत्त वासकर महाराज व हभप जयवंत बोधले महाराज हे दोघे या सभेत आपले विचार व्यक्त करणार आहे.”
उद्धव ठाकरे यांचा दौरा
मुंबई हुन 1 वाजता पंढरपूर येथील विश्रामगृह येथे हेलिकॉप्टर ने आगमन
1 ते 3 शिष्टमंडळ भेटी
3.30 श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन
4 वाजता सभास्थळी
5.30 विश्रामगृह आगमन
6.30 वाजता चंद्रभागा नदी तीरावरील इस्कॉन घाटावर महा आरतीसाठी उपस्थिती
7.45 वाजता वाहनाने पुणे कडे रवाना
चंद्रभागा तीरावर महाआरती
महासभेनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटूंब चंद्रभागा नदीची आरती करणार आहेत. नदी पैलतीरावरील इस्कॉन घाट येथे या आरतीचे भव्य असे नियोजन केले आहे. या ठिकाणी हभप ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्या वारकरी शाळेतील बाल वारकरी तसेच ब्रम्हवृंद सहभागी होणार आहे.
दोन हजार वाहनांची पार्किंग व्यवस्था…
महासभेसाठी राज्यातूनच नव्हे बाहेरुनही मोठ्या संख्येने राम आणि शिवभक्त दाखल होणार असल्याने पोलिसांनी दोन हजार वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे.
१५०० विशेष बसेस
पंढरपूरकडे येणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन परिवहन महामंडळाने एस टी च्या जादा १५०० बसेस सोडण्याचे नियोजन केल असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावेत यांनी दिली.
शिवसेना पक्षप्रवेश लांबणीवर
या महामेळाव्याच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातील काही बडे नेते हे शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र हे राजकीय व्यासपीठ नाही. पक्ष प्रवेशाची यादी एवढी मोठी आहे की त्यासाठी स्वतंत्र कार्यक्रम घेऊ उद्याची सभा ही फक्त राममंदिर, दुष्काळ, संपूर्ण कर्जमाफी आणि बेरोजगारी या विषयी होणार असल्याचे खा.संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
पंढरी भगव्या रंगात न्हाऊन निघाली
पंढरपूर शहरात येणारे सर्व रस्ते, सभास्थळ, मंदिर परिसर, चंद्रभागा वळवंट भगवे ध्वज, स्वागत कमानी, स्वागत फलकांची फुलून गेली आहेत. असे वाटते श्री विठुरायाची पंढरी नगरी भगव्या रंगात न्हाऊन निघाली आहे.
www.3dnews.in
0 Comments