परदेशात नोकरीच्या आमिषाने गंडा
उल्हासनगर : परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने उल्हासनगर शहर आणि आसपासच्या भागातील तब्बल ३१ बेरोजगार तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. एकूण १ कोटी ६६ लाख रुपये तिघांनी लाटले असून याप्रकरणी उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत आहे.
देशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. त्यात परदेशात नोकरी देण्याच्या अमिषानेही ३१ जणांना १ कोटी ६६ लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. उल्हासनगर आणि आसपासच्या भागातील ३१ जण यात फसले आहेत
. तक्रारदार करनेलसिंग भट्टी यांना दिलेल्या यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात नितीन उर्फ नवीन आसनानी, अमित धर उर्फ दीपक शर्मा आणि वीणा धर उर्फ सुषमा धर यांनी तक्रारदार यांच्या नातेवाईकांसह इतर ३१ जणांना सिंगापूरसह कॅनडा आणि लंडन येथे नोकरी लावून देतो, असे आश्वासन दिले होते. त्याच्या बदल्यात त्यांच्याकडून विविध ठिकाणी वेळोवेळी ४ लाख ते १४ लाखांपर्यंत तब्बल १ कोटी ६६ लाख ६६ हजार रुपये लाटण्यात आले. तसेच नोकरीच्या नावाखाली सिंगापूर येथील स्टॅनफोर्ड लिमिटेड कंपनीचे खोटे नेमणूकपत्रही दिले. यावेळी नोकरीसाठी दिलेली कागदपत्रे आणि पासपोर्ट परत न केल्याने फसवणुकीचा प्रकार समोर आला. याबाबत आर्थिक गुन्हे शाखेच्या अभय धुरी यांना विचारले असता, आताच हा तपास हाती आला असून वेळोवेळी याची माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.
0 Comments