पालिका शाळांचे वर्ग होणार डिजिटल
ठाणे:
ठाणे महापालिका शिक्षण मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी २०० वर्ग डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी ७ कोटी ६० लाखांचा खर्च येणार आहे. हे काम फेब्रुवारीअखेर पूर्ण होणार आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळा डिजिटल झालेल्या दिसणार आहेत .
पाल्यांचा शाळेत प्रवेश करायचा झाल्यास बहुतांश पालकांचा कल हा खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे अधिक असतो. लाखो रुपये देणगी देऊन या शाळांत प्रवेश घेण्यासाठी पालकांची धडपड सुरू असते. मात्र आता महापालिकेच्या शाळांचा कायापालट करण्यात येणार आहे. अनेक शाळा डिजिटल होणार असून येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना ई-लर्निंगच्या माध्यातून शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. येत्या जूनपासून २०० वर्गांमध्ये डिजिटलची सुविधा सुरू होणार आहे.
राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम राबविला जात आहे. या योजनेंतर्गत प्राथमिक व माध्यमिक शाळा प्रगत करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजिटलद्वारे सहज शिक्षण कसे देता येऊ शकेल, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ठाणे महापालिकेच्या एकूण १३२ शाळांमधील प्राथमिकच्या ३२ व माध्यमिकच्या १६८ वर्गखोल्या डिजिटल करण्याबाबत निविदा मागविण्यात आली आहे. यासाठी ७ कोटी ६० लाखांचा खर्च होणार आहे.
ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने पालिकेच्या १३६ शाळांमधील २०० वर्ग डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी ७ कोटी ६० लाखांचा खर्च असून याबाबत निविदा मागविण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी अखेरपर्यंत डिजिटल वर्गाचे काम पूर्ण होईल
- उर्मिला पारधे, शिक्षणाधिकारी, ठाणे महापालिका
0 Comments