-->

Ads

आदिवासींमधील व्यसनाधीनता कायम!

स्थलांतर करत जगणाऱ्या भटक्या जमाती, दैनंदिन रोजगारासाठी संघर्ष, शैक्षणिक सुविधांपासून दूर, कष्टप्रत कामांचा थकवा अशा विविध कारणांमुळे आदिवासी पाड्यांमधील दारू व्यसनाचे प्रमाण कायम आहे. आदिवासी कुटुंबातील ७५ टक्के मंडळींमध्ये दारूचे व्यसन असून त्यापैकी ५० टक्के पाड्यांमध्ये दारू सहज उपलब्ध असल्यामुळे व्यसनाचे प्रमाण अधिक असल्याचा प्रकार समोर आला आहे. दारूचे व्यसन करणारे ९७ टक्के लोक दारिद्र्यरेषेखालील असून ७५ टक्क्यांहून अधिक मंडळी दररोज २० रुपयांपेक्षा जास्त खर्च व्यसनावर करतात. ६५ टक्के लोकांना दारूच्या दुष्परिणामांचीही माहिती नसून सुमारे ८० टक्के व्यक्तींना दारूच्या व्यसनापासून दूर जायचे असल्याचे निरीक्षण समाजकार्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदविले आहे. रायगड पोलिसांच्या पुढाकाराने एस. पी. फेलोशिपच्या माध्यमातून तरुणांनी या नोंदी केल्या आहेत.
कातकरी समाजाची मोठी संख्या असलेल्या रायगड जिल्ह्यामध्ये व्यसनाधीनतेचे प्रमाण मोठे आहे. तसेच, निरक्षरता, बेरोजगारी, बालविवाह, कुपोषण, अंधश्रद्धा अशा अनेक समस्यांनी हा परिसर ग्रस्त आहे. कातकरी समाजातील आर्थिक आणि सामाजिक दरी दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर विविध प्रयत्न होत असले तरी व्यसनाधीनता दूर करण्यात अद्याप प्रशासनाला पुरेसे यश मिळत नसल्याचे समोर आले आहे. समाजकार्य विषयाचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी या क्षेत्रामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कार्यरत होते. आपल्या कामाचा उपयोग प्रशासकीय यंत्रणांना व्हावा, या उद्देशाने त्यांनी या भागातील पोलिस प्रशासनाच्या मदतीने आदिवासी समाजातील व्यसनाधीनतेवर अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. रायगड पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर यांनीही याला सहमती देऊन एस. पी. फेलोशिपच्या माध्यमातून या भागात या विद्यार्थ्यांनी काम सुरू केले. जलद ग्रामीण मूल्यमापन पद्धतीच्या मदतीने राजगडच्या सुधागड तालुक्यातील ३९ पाड्यांमधील ७०० आदिवासी बांधवाचे सर्वेक्षण करून त्यांच्याकडून व्यसनाविषयीची माहिती संकलित करण्यात आली. त्यावेळी अनेक धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामध्ये अनेक नागरिकांना दारूच्या दुष्परिणांमाची माहितीच नव्हती. तसेच, दारूचे व्यसन असणारे बहुतांश आदिवासी दारिद्र्यरेषेखालील असून दररोज २० रुपयांपेक्षाही जास्त पैसे दारूवर खर्च केले जात असल्याचीही दिसून आले. त्यामुळे कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त होत असतानाही अनेकांमधील व्यसनाचे प्रमाण कमी होत नसल्याचे निरीक्षण या विद्यार्थ्यांनी नोंदविले आहे.
दारूमुक्तीसाठी शिफारशी
आदिवासी बांधवांमध्ये असलेल्या दारूच्या व्यसनाधीनतेचा अभ्यास करत असताना त्यांच्याशी बोलल्यानंतर तसेच काही निरीक्षणाद्वारे या विद्यार्थ्यांनी शिफारशी पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत. त्यामध्ये प्रशासनाच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. शालेय, महाविद्यालयीन तसेच आदिवासी पाड्यांतील तरुण मंडळांच्या माध्यमातून दारूच्या दुष्परिणामांची सातत्याने जागृती करणे. आदिवासी तरुणांशी संवाद साधत त्यांना प्रशिक्षित करणे, अशा शिफारशी करण्यात आल्या आहेत. तर, दारूमुक्तीसाठी रोजगाराच्या जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्याची विनंती या विद्यार्थ्यांनी केली आहे. अमिटी विद्यापीठ मुंबईचे सहाय्यक प्रा. अमेय महाजन यांच्या नेतृत्वाखाली १३ विद्यार्थ्यांच्या गटाने हे सर्वेक्षण पूर्ण केले. आदित्य सालेकर, ऐश्वर्या देसाई, भूषण अंबाडे, चाऊस शेख, रेणुका त्रिगुणाईत, नेहा कोर्लेकर, जिज्ञासा अरुणदेकर, कृतिका मंडलिक, मनोज गायकवाड, उज्वला शिंदे, महेश ढोकरे, कल्पेश नाईक या विद्यार्थ्यांनी हे सर्वेक्षण पूर्ण केले.

Post a Comment

0 Comments