-->

Ads

मजबूत करिअर…

महिलांच्या करिअरच्या दिशा अधिक व्यापक होत असून ज्या क्षेत्रात यापूर्वी कधीच महिला उतरल्या नव्हत्या, अशा क्षेत्रांमध्ये महिलांचे पदार्पण होत आहे. त्यामध्ये त्यांचे स्वागत होत आहे. ठाण्यामध्ये लाऊंज या संस्कृतीने शिरकाव केल्यानंतर या भागातील नव्या करिअरच्या संधी निर्माण झाल्या. परंतु या संधीचा फायदा घेत गर्दीवर नियंत्रण करणे, येणाऱ्या मुलींशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, याची खबरदारी घेणे, यांसारख्या कामाच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय समीक्षा कांबळे या तरुणीने घेतला. अत्यंत प्रतिकूल वातावरण आणि महिलांचा शिरकाव नसलेल्या या क्षेत्रात उतरलेल्या समीक्षा यांनी आपल्या मजबूत शरीरयष्टी आणि कराटेच्या कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ठाण्यातील पहिली महिला बाऊन्सर म्हणून त्यांची ओळख असली तरी हे क्षेत्र म्हणजे महिलांची काळजी घेण्याचा एक प्रकार आहे, असे त्या मानतात.
ठाण्यात लहानाची मोठी झालेल्या समीक्षा कांबळे यांचे शिक्षण श्रीमती सावित्रीबाई थिराणी शाळेमध्ये झाले. पवारनगर येथील त्या रहिवासी आहेत. लहानपणापासून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला. परंतु त्यांना खेळाची आवड असल्यामुळे शारीरिक कसरती करून मजबूत शरीरयष्टी कमवण्याकडे त्यांनी भर दिला. याशिवाय कराटे आणि अन्य स्वसंरक्षणाचे खेळ आत्मसात करून त्यामध्ये प्रगती केली. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये त्या संपूर्ण वेळ देऊ लागल्या. वडिलांच्या कंपनीच्या अस्थिरतेमुळे दहावीपासूनच त्यांनी नोकरीचा पर्याय निवडला. सध्या त्या एरोली स्पोर्ट्स असोसिएशनमध्ये सकाळच्या वेळात जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतात. तर रात्री ७ नंतर लाऊंजमध्ये बाऊन्सर म्हणून कार्य़रत असतात. बाऊन्सर हे करिअर म्हणजे गर्दीवर नियंत्रण आणण्याचा एक प्रकार आहे. मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी, त्यामध्ये महिलांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची काळजी घेणे, हे आमचे महत्त्वाचे काम असते. अनेक मुली आणि महिला येतात. त्यांना लक्षपूर्वक सांभाळणे ही अत्यंत वेगळी जबाबदारी असते. मुलगी म्हणून हे समजून घेणे महत्त्वाचे आहे, असे समीक्षा सांगतात. ठाण्यातील पहिली महिला बाऊन्सर म्हणून मिळालेला गौरव आपल्यासाठी महत्त्वाचा असून वेगळ्या क्षेत्रात नवा कमावल्यामुळे सर्वांचे प्रोत्साहन नेहमीच राहिल्याचे त्या सांगतात.

Post a Comment

0 Comments